You are currently viewing मुलांना फक्त विद्यार्थी बनवू नका तर !चांगला माणूस बनवा -: बीडीओ विजय चव्हाण

मुलांना फक्त विद्यार्थी बनवू नका तर !चांगला माणूस बनवा -: बीडीओ विजय चव्हाण

चर्मकार समाज उन्नती मंडळ तळेरे-कासार्डे प्रभाग विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन*

तळेरे : प्रतिनिधी

मुलांना काय वाटतं हे महत्त्वाचे आहे, मुलांना फक्त विद्यार्थी बनवू नका तर चांगला माणूस बनवा,पालकांनी मुलांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नये,त्या ओझ्याखाली लहान मुलांचा अक्षरशः जीव गुदमरून जातो आहे, इंग्रजी शाळांचा हट्ट पालकांनी मुळीच धरू नये,मराठी शाळेतूनच ख-या अर्थांनी मुलांना योग्य संस्कारासह जीवन जगण्याचे शिक्षण मिळते असे प्रतिपादन कुडाळचे बीडीओ विजय चव्हाण यांनी कासार्डे येथील विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात केले.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, प्रभाग तळेरे कासार्डे पंचक्रोशी आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात विजय चव्हाण बोलत होते.
हा सोहळा कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव, कणकवली तालुका अध्यक्ष महानंद चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव, जिल्हा सहसचिव लवेंद्र किंजवडेकर,अनिल चव्हाण, कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर, संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र वाघेरकर,राजेंद्र चव्हाण, तळेरे कासार्डे विभागाचे अध्यक्ष तथा कासार्डे गावचे पोलिस पाटील महेंद्र देवरुखकर,रुपेश बांदेकर,शंकर चव्हाण, तालुका सचिव संतोष जाधव, कोषाध्यक्ष संजय चव्हाण,देवेंद्र देवरुखकर व दत्ताराम जाधवआदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवेंद्र देवरुखकर यांनी करताना कासार्डे तळेरे विभागाच्या आदर्शवत उपक्रमाची माहिती दिली.
यानंतर कला, क्रीडा सांस्कृतिक, शैक्षणिक विविध स्पर्धा परीक्षा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तु, सन्मानपत्र व पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कासार्डे विद्यालयाचे एन.सी. कुचेकर म्हणाले की,विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी दशेत कठोर परिश्रम घ्याल तरच मोठे व्हाल असा संदेश त्यानी देत गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष महानंद चव्हाण, नामदेव जाधव,अनिल चव्हाण,व कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विभागीय अध्यक्ष महेंद्र देवरुखकर यांनी ही समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी नेहमी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन उज्वल यश संपादन करावे आणि यशाचा आलेख सातत्याने चढता ठेवावा असे आवाहन केले.
जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव यांनी मार्गदर्शन करताना ओरोस येथे समाज भवन बांधून त्याठिकाणी युवा पिढीतील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी,यूपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचा मनोदय याप्रसंगी व्यक्त केला.
दरम्यान गुणवंत विद्यार्थी वर्गाबरोबरच ‘ शिक्षक रत्न राज्य पुरस्कार’ विजेते प्रा. देवेंद्र देवरुखकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याशिवाय उपस्थित सर्व मान्यवरांचा कासार्डे -तळेरे विभागाच्यावतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला दारूम- तळेरे गावचे पोलिस पाटील संजय बिळसकर,बॅंकचे शाखा व्यवस्थापक विजय देवरुखकर अन्य जेष्ठ ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शंकर चव्हाण यांनी तर आभार देवेंद्र देवरुखकर यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तळेरे – कासार्डे प्रभागातील सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व सभासदांनी विशेष मेहनत घेतली.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा