तळवडा बाजारपेठेतही पाणी : जनजीवन विस्कळीत
वेंगुर्ले
दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वेंगुर्ले सावंतवाडी या मार्गावरील होडावडा येथील मुख्य पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच या पाण्यामुळे होडावडा आणि तळवडा या गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच तळवडा बाजारपेठेतही पाणी आले असून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वेंगुर्ले तालुक्यात वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. होडवडा नदीला पूर आल्याने होडावडा पूल पाण्या खाली गेला असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तालुक्यात नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत. सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्याने बाजार पेठेतील ग्राहकांची रेलचेल कमी आहे. समुद्राला उधाण आले असून मोठमोठ्या अजस्त्र लाटा किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत.नागरिकांनी सावध रहावे स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन वेंगुर्ले आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.