सावंतवाडी:
सतत दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे तेरेखोल नदीपात्राने आपली पाण्याची पातळी ओलांडली आहे. या नदीपात्रालगतच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. आंबोली- बेळगाव मार्गावर माडखोल धवडकी बाजारपेठेत रस्त्यावर पाणी आले होते त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सायंकाळी साडेचार वाजल्यापासून बंद करण्यात आली होती. आंबोली – बेळगाव मार्ग पाण्याखाली गेला होता. या मार्गालगतच तेरेखोल नदीपात्र येत असल्याने या गावांना तहसील विभागाने अलर्ट केले आहे. शिरशिंगे – गोटवे वाडी येथील यापूर्वी खचलेल्या डोंगराचा भागात अतिवृष्टीत कुठलाही धोका उद्भवू नये म्हणून सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी अशा धोकादायक गावांना सूचना जारी केले आहेत. शिरशिंगे, गोटवेवाडी, असनिये अशा सह्याद्री पट्ट्यातील डोंगरालगतच्या गावामध्ये सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली.