कणकवली :
निसर्ग सौदर्याने समृद्ध कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयात रमणीय अशी पर्यटन स्थळे आहेत, मात्र तारकर्ली सारखी काही ठरावीक पर्यटन स्थळे वगळता इतर पर्यटन स्थळे प्रकाशझोतात नाहीत. सिंधुदुर्गात येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांना ही सर्व पर्यटन स्थळे पाहता यावीत यासाठी सिंधुदुर्गचे पर्यटन सर्कीट विकसित व्हायला हवे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केली.
पर्यटन विभाग महाराष्ट्र शासनाच्यावतीने बुधवारी कणकवलीतील विवेकानंद सभागृहात कोकण प्रादेशिक पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याहस्ते झाले. जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रोबेशनल आयएएस ऑफीसर करिश्मा नायर, कोकण प्रादेशिक पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे, पर्यटन क्षेत्रातील डॉ. मिनल ओक, विष्णू उर्फ बाबा मोंडकर, कमलेश चव्हाण, राहुल कुलकर्णी, संपदा कुलकर्णी, सुहास ठाकूर-देसाई आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाल्या, कोकण पर्यटन परिषद सिंधुदुर्गात आयोजित केल्याबद्दल पर्यटन विभागाला धन्यवाद देते. पर्यटन विकासाच्या मुलभूत सोयी सुविधां बरोबरच जिल्हयात हॉस्पिटॅलिटी सेंटरचे ट्रेनिंगही देणे आवश्यक आहे. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये टूर ऑपरेटर, छू गाईड सासारखे कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. स्वदेश दर्शन पर्यटन विकासांतर्गतही काही योजनाही प्रस्तावित आहेत. चिपी विमानतळामुळे काही प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र नजीकच्या मोपा विमानतळामुळे त्यावर काय परिणाम झाला याचेही अवलोकन करणे आवश्यक आहे. केरळच्या धर्तीवर सिंधुदुर्ग पर्यटनाच्या व्यापक प्रचार प्रसिद्धीसाठी सोशल मिडीयाचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. तसेच काही टूरिझम वेबसाईटही डेव्हलप करणे आवश्यक आहेत. पर्यटन विभागाने स्थानिकांचा सहभाग वाढवून पर्यटन विकासाला चालना द्यावी यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ढील महिन्यात आंबोलीत होणाच्या मान्सून फेस्टिव्हलला पर्यटन व्यावसायिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी पर्यटन विकासासाठी शासन आवश्यक त्या सुविधा देईल परंतू त्याला मर्यादा आहेत. यामध्ये पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिकांचाही पुढाकार महत्वाचा असल्याचे सांगितले. पर्यटन व्यावसायिक संजीव नाईक यांनी कोकण पर्यटन विकासासाठी काही टिप्स दिल्या तर पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे यांनी कोकण प्रादेशिक पर्यटन विभागाकडून पर्यटन विकासाच्या योजना, कोकणातील विविध प्रकारचे पर्यटन याबाबतचे सादरीकरण केले.
पर्यटन क्षेत्रातील डॉ. मिनल ओक, विष्णू उर्फ बाबा मोंडकर, सतीश लळीत, कमलेश चव्हाण, राहुल कुलकर्णी, संपदा कुलकर्णी, सुहास ठाकूरदेसाई यांच्यात कोकण पर्यटन विकासाच्या अनुषंगाने पॅनेल चर्चा झाली. परिषदेला सिंधुदुर्गसह कोकणातील पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.