You are currently viewing व्ही. एन. नाबर शाळेतील मुलांनी लुटला तरवा लावण्याचा आनंद

व्ही. एन. नाबर शाळेतील मुलांनी लुटला तरवा लावण्याचा आनंद

*”शेती कामाचा अनुभव” उपक्रम झाला न्हावेली गावी*

 

सावंतवाडी :

कोकणात पावसाळा सुरू झाला की शेतीच्या कामांना वेग येतो. तरवा पेरणी, काढणी आणि लावणी ही कामे प्रामुख्याने पावसावर अवलंबून असतात आणि शेतीच्या कामांना आवश्यकता असते ती माणसांची. अलीकडे शेतीची कामे विविध मशिनरी वापरून केली जातात. त्यामुळे नव्या पिढीला आणि मुख्यत्वे शहरातील युवा पिढीला शेती कामाचे ज्ञान नसते आणि अनुभव देखील नसतो. त्यामुळे शेती कामाचा अनुभव देण्यासाठी व्ही.एन. नाबर शाळेच्या सातवी आणि आठवीच्या मुलांना उपक्रमांतर्गत न्हावेली येथील सामाजिक कार्यकर्ते बंटी नाईक यांच्या शेतावर नेण्यात आले होते.

सकाळी न्हावेली येथे पोचताच माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद नाईक यांच्या घरी मुलांना चहापान व न्याहारी देण्यात आली. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते श्री बंटी नाईक यांच्या शेतावर मुलांना नेऊन त्या ठिकाणी तरवा कसा लावावा याबद्दल योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले. त्या माहितीच्या आधारे व्ही.एन. नाबर शाळेच्या सातवी आणि आठवीच्या मुलांनी नांगरलेल्या शेतात भाताची रोपे लावून शेती करण्याचा आनंद लुटला. न्हावेली म्हणजे चारही बाजूंनी डोंगर दर्यांनी वेढलेला निसर्ग संपन्न असा सुंदर गाव. अशा या निसर्ग संपन्न गावात पावसाळ्यात शेतात काम करण्याचा आनंद म्हणजे एक पर्वणीच असते. शहरात राहणारी मुले मातीच्या संपर्कात नसतात परंतु शेती कामाचा अनुभव घेताना याच धरणीची माती अंगाला लावून देखील आनंद लुटता येतो हे शेतात काम केल्यानंतरच या शाळेतील मुलांना नक्कीच अनुभवायला मिळाले.

शेतात काम करत चिखल तुडवीत आनंद लुटून ही शाळकरी मुले पुन्हा एकदा आनंद नाईक यांच्या घरी परतली. शेतातील थंडगार पाण्यात हातपाय गारठल्याने आनंद नाईक यांच्या घरी मुलांना हात पाय धुण्यासाठी गरम पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. गरम पाण्याने हातपाय धुवून शेतात श्रमपरिहार केल्याने भूक लागलेल्या मुलांनी दुपारी जेवणाचा येथेच्छ आनंद घेतला. शाळकरी मुलांना शेतावर काम करायला देण्यासाठी देखील मनाचा मोठेपणा लागतो. कारण शाळकरी मुलांकडून शेती करून घेतल्यावर चांगल्या पद्धतीने रोपे रोवली जातील की नाही? अशी शंका असते; परंतु सामाजिक कार्यकर्ते श्री.बंटी नाईक यांनी स्वतःच्या शेतात काम करायला दिल्याबद्दल आणि उत्कृष्ट अशी जेवणाची सोय ग्रामपंचायत सदस्य श्री.आनंद नाईक यांनी केल्याबद्दल नाबर शाळेकडून सर्वांचे आभार मानण्यात आले. दिवसभर शेताच्या बांधावर काम करून उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊन मुले आनंदाने शाळेकडे परतली.

शेती करण्याचा अनुभव या उपक्रमामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनाली देसाई, शिक्षिका श्रीमती रसिका वाटवे, सौ. कल्पना परब, श्री.प्रशांत देसाई व श्री हर्षद खडपकर आदी सहभागी झाले होते.

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनीही आनंद नाईक यांच्या निवासस्थानी आवर्जून भेट दिली आणि शाळेच्या शेतीविषयक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या सोबत माजगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आबा सावंत, मळेवाड ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा