सावंतवाडी
जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करावा, तसे न झाल्यास येथील जनता आम्हाला कदापि माफ करणार नाही, असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून किमान १०० कोटीचा निधी जिल्ह्यासाठी मिळावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मी शब्द टाकणार आहे. येणाऱ्या ६ महिन्याच्या काळात सिंधुदुर्गचा कायापालट झालेला दिसेल, असे ही श्री. केसरकर म्हणाले.
श्री. केसरकर यांचा वाढदिवस १८ तारखेला होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज आपल्या निवासस्थांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मला कायापालट करायचा आहे. त्या दृष्टीने माझी वाटचाल सुरू आहे. आज जी जिल्ह्यात विकासकामे होत आहेत. ती मी पालकमंत्री असताना आणलेल्या निधीतून होत आहेत. येणाऱ्या काळात सुध्दा मला जिल्ह्यात अनेक विकास कामे, प्रकल्प आणायचे आहेत. त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरु आहेत. मात्र सुदैवाने माझ्यासह मंत्री उदय सामंत व रविंद्र चव्हाण यांच्या रुपाने जिल्ह्याला ३ मंत्रीपदे मिळाली आहेत. त्याचा फायदा जिल्ह्यातील तळागाळात काम करणाऱ्या लोकांना झाला पाहिजे, तसे न झाल्यास येथील जनता आम्हाला कदापि माफ करणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.