You are currently viewing सेवानिवृत्त शिक्षक नियुक्ती ही व्यवस्था आहे, आदेश नाही

सेवानिवृत्त शिक्षक नियुक्ती ही व्यवस्था आहे, आदेश नाही

मुलांची गैरसोय टाळण्यासाठी घेतलेला निर्णय आहे:शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली भूमिका स्पष्ट

सावंतवाडी

शिक्षक भरतीला उशीर होणार म्हणून तात्पुरती व्यवस्था म्हणून सेवानिवृत्त शिक्षक घेण्याचे धोरण ठरविले आहे. तसा आदेश काढलेला नाही. अडिज लाखापेक्षा जास्त लोकांनी शिक्षक भरतीसाठी आवश्यक परीक्षा दिलेली आहे. त्यातून ३० हजार शिक्षक पदे भरली जाणार आहेत. लवकरच जिल्हा परिषादांकडून जाहिराती प्रसिद्ध होतील. त्यात उमेदवारांना कोणता जिल्हा निवडावा, ही संधी मिळणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी भरती आहे. एकूण ८० टक्के भरती करण्यास परवानगी मिळालेली आहे. किमान एकूण ५० हजार शिक्षकांची भरती होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत दिली.

पुढे बोलताना मंत्री केसरकर यांनी, सुशिक्षित बेरोजगारांना तात्पुरत्या नियुक्त्या देण्यासाठी परीक्षा घ्यावी लागणार. त्यासाठी महिना उलटून जाणार आहे. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याचा तात्पुरता निर्णय घेतला आहे. डी एड, बी एड बेरोजगारांना सिनियर, ज्युनिअर केजी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. सर्वानाच नोकऱ्या मिळणार नाहीत. आता अडीज लाख मुलांनी परीक्षा दिली आहे. त्यातील ५० हजार मुलांनाच नोकऱ्या मिळणार आहेत. जिल्ह्यासाठी वेगळा निर्णय घेता येवू शकत नाही. जिल्ह्यातील डी एड, बी एड धारकांच्या भावना मी समजू शकतो. परंतु त्यांच्यासाठी उपाय काय करता येईल, यावर माझी चर्चा सुरू आहे. रिक्त जागा राहिल्या तरी ओरड करायची. तात्पुरती व्यवस्था केली तरी ओरड करायची. याला शेवट नसतो. परंतु मुलांचे हित लक्षात घेवून निर्णय घ्यायचे असतात. नवीन शिक्षक भरतीतून घेतले तरी त्यांना डाएट मार्फत प्रशिक्षण दिले जाते. तर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक घेताना त्यांनाही प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. त्यात वेळ जाणार म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही तात्पुरती व्यवस्था केलेली आहे, असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा