– जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांचा इशारा
महाराष्ट्र शासनाने रिक्त जागांवर निवृत्त शिक्षकाना नेमणूका देण्याचा शासन निर्णय काढला असून त्यांना वीस हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. हा बेरोजगार डी.एड. तरूणांच्या जखमेवर मीठ चोळण्या सारखे आहे. एका बाजूला जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार तरुण आमरण उपोषणासारखे आंदोलन करत आहेत आणि त्या गरजू तरुणांना रोजगार उपलब्ध करून न देता जे शिक्षक निवृत्त आहेत ज्यांनी आपली नोकरी पूर्ण करून पेंशन घेत आहेत आणि त्यांचे आयुष्य स्थीर स्थावर आहे त्यांना पुन्हा नियुक्ती देऊन हे सरकार डी.एड गरजू बेरोजगार तरूणांची जीवघेणी चेष्टा करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी. एड. बेरोजगार युवक युवतींनी हल्लीच आमरण उपोषण केले होते त्यावेळी जिल्ह्यातील आमदार असलेल्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्र्याना त्याची दखल घेण्यासाठी वेळ नव्हती आणि आता जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगारांना जिल्ह्यातील रिक्त जागी नियुक्ती देण्याची संधी असताना निवृत्त शिक्षकाना नियुक्ती देण्याचे आदेश काढून जिल्ह्यातील असलेल्या शिक्षणमंत्र्यानी आपणाला तरूणांच्या भविष्याची किती चिंता आहे हे दाखवून दिले आहे. गेली चौदा वर्षे आमदार, पाच वर्षे पालकमंत्री आणि आता जवळपास एक वर्ष शिक्षणमंत्री असलेल्या दिपक केसरकर यांनी जिल्ह्यातील जनतेला एवढ्या वर्षात फक्त गाजर दाखवण्याचे काम केले आहे.जिल्ह्यातील शिक्षणमंत्री असताना जिल्ह्यातील 114 शाळांमध्ये एक ही शिक्षक नाही हे लांछनास्पद आहे. जिल्ह्यात शिक्षक कमी असताना परजिल्ह्यातील सिंधुदुर्गात कार्यरत असलेल्या शिक्षकांना दुसऱ्या जिल्ह्यात बदली देण्याचा तुघलकी निर्णय शालेय शिक्षणमंत्र्यांच्या खात्याने घेतला आणि शालेय शिक्षणात महाराष्ट्रात अव्वल स्थानावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. आता तरी शासनाने निवृत्त शिक्षकांच्या नेमणूकीचा आदेश रद्द करून जिल्ह्यातील डी.एड बेरोजगार युवक युवतीना जिल्ह्यातील रिक्त पदांवर नेमणूक देण्याचा आदेश काढावा अन्यथा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने घेराव घालण्यात येईल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिला आहे.