You are currently viewing सामाजिक बांधिलकी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

सामाजिक बांधिलकी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

सावंतवाडी बस स्थानकासमोरील उघड्या गटारावर बसवल्या फरशा

सावंतवाडी

सावंतवाडी वेंगुर्ला बस स्थानकासमोरील उघड्या गटारावर फरशी बसवण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी करून देखील लक्ष दिले गेले नव्हते. अखेर नागरिकांना निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर शुक्रवारी या उघड्या गटारावर फरशा बसविल्या.
सावंतवाडी येथील वेंगुर्ला बस स्थानकाच्या समोरील उघड्या गटारावर झाकण बसविण्यात यावी अशी मागणी सामाजिक बांधिलकी संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सदरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर सामाजिक बांधिलकीच्या मागणीला यश आले. वारंवार होणारे अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या उघड्या गटारांवर फरशा घालण्यात आल्या.
गेली कित्येक वर्ष ही गटारे उघडी असल्या कारणाने वारंवार ज्येष्ठ नागरिक, वृद्ध व्यक्ती, तसेच शाळकरी मुले पडून जखमी व्हायचे. त्यातील काही व्यक्तींना सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून औषध उपचार देखील करण्यात आले होते. आता या फरशा बसविण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांना होणारी समस्या दूर केल्यामुळे या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सदरे यांचे सामाजिक बांधिलकीकडून आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा