स्थानिक गुन्हा अन्वेषणची मोठी कारवाई;३० लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त
ओरोस
महाराष्ट्र, गोवा राज्यासह कर्नाटक राज्यात घरफोडीचे ४५ गुन्हे असलेल्या मूळ गोवा येथील फरार आंतरराज्य गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील ( वय ३७) याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कणकवली तालुक्यातील वागदे येथील राहत्या घरातून अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.
त्याच्या जवळ एक गावठी कट्टा, तीन जिवंत राऊंड, एक काडतूस, २७ जिवंत काडतुसे, पाच तलवारी, चार लाख ६९ हजार ९५० रुपयांची रोख रक्कम, लोखंडी हातोडे, पक्कड, कटावणी, ११ विविध कंपन्यांचे मोबाईल हँडसेट, १६६ ग्रॅम १६ मिली वजनाचे ९ लाख ६८ हजार ४९० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, पाच किलो ३०० ग्रॅम वजनाचे ३ लाख ३५ हजार ८४४ रुपये किमतीच्या चांदीच्या विटा व दागिने, पैसे मोजण्याची इलेक्ट्रिक मशीन, सोने चांदी वितळण्याची इलेक्ट्रिक मशीन, तीन ड्रील मशीन, एक दुचाकी, एक चार चाकी असा एकूण ३० लाख ४८ हजार ७८४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपी विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे यावेळी एस पी अग्रवाल यांनी सांगितले.