बेफिकीर प्रशासन अन् खुर्चीसाठी झगडतेय शासन
*मोती तलावाच्या काठावरून…..
ऐतिहासिक वारसा लाभलेले सावंतवाडी शहर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जणू नाकच…! महाराष्ट्रातील सुंदर शहर म्हणून प्रसिद्ध पावलेले सावंतवाडी शहर आज राजकीय अनास्थेपोटी विद्रुप होताना दिसत आहे. सावंतवाडी शहराच्या मध्यभागी असलेले मोती तलाव म्हणजे एकेकाळी सावंतवाडी शहराची शान. मोती तलावाच्या चहुबाजूने सावंतवाडी शहर वसलेले असून सावंतवाडी संस्थांनाचा राजवाडा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुने श्री.पंचम खेमराज महाविद्यालय, ऐतिहासिक वास्तू असलेले न्यायालय, सावंतवाडी शहर नगरपरिषद, पूर्वीचे जिल्हा रुग्णालय आणि आताचे उपजिल्हा रुग्णालय अशा अनेक वास्तू याच सावंतवाडी शहराच्या तलावाच्या काठाने उभ्या आहेत. सावंतवाडी शहराची बाजारपेठ ही देखील तलावाच्या बाजूलाच बसते. पूर्वीचा मुंबई गोवा जुना महामार्ग देखील या तलावाच्या काठाकाठाने गोव्याकडे जातो. त्यामुळे सावंतवाडी शहरातील मोती तलावाला विशेष असे वैशिष्ट्य प्राप्त झालेले आहे.
याच ऐतिहासिक मोती तलावात प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे तलावाचा कठडा गतप्राण होऊन पडला होता. नागरिकांनी आंदोलनाचे इशारे दिल्यानंतर या कठड्याची पुनर्बांधणी झाली; परंतु तलावात साचलेला गाळ काढण्यासाठी मात्र प्रशासन आणि शासनाकडून दिरंगाई झाली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जेव्हा कोकणात पावसाला सुरुवात होण्याची वेळ असते त्यावेळी प्रशासनाने गाळ काढण्यासाठी मशिनरी आणल्या परंतु या मशिनरी तलावात उतरविण्यासाठी जेवढी माती तलावात भराव केली तेवढा सुद्धा तलावातील गाळ प्रशासनाकडून काढला गेला नाही. त्यामुळे “डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा” प्रकार सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने केला. सावंतवाडी शहरात राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले नाम.दीपक केसरकर राहतात त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.श्री.रवींद्र चव्हाण हे तर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. तरीदेखील तलावाचा कठडा बांधणे सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्षभर शक्य झाले नव्हते आणि तलावातील गाळ काढणे देखील तलावातील पाणी भर उन्हाळ्यात सोडल्यानंतर तलाव सुकला तरी वेळेत सुरू करता आले नाही हे सावंतवाडीवाशीयांचे दुर्दैव…!
सावंतवाडी शहराची शोभा वाढावी आणि सावंतवाडी शहर परिसरातील विहिरींना मुबलक पाणीसाठा रहावा या उद्देशाने संस्थान काळात सावंतवाडीचा तलाव बांधला गेला. याच मोती तलावाच्या काठावर आद्यकवी केशवसुतांनी “तुतारी” “संध्याकाळ” यासारख्या ज्वलंत काव्यरचना लिहिल्या. कवी डॉ. वसंत सावंत यांनी अनेक कविता याच सावंतवाडीच्या तलावाकाठी बसून केल्या. अनेकांनी याच मोती तलावाच्या काठावर बसून आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या, तर काही भ्याड व्यक्तींनी आयुष्यातून दूर होण्यासाठी याच मोती तलावाच्या पाण्यात उडी टाकून जीवनाचा अंत केला. सावंतवाडी शहराला लागूनच असलेल्या नरेंद्र डोंगराने आपली छत्रछाया सावंतवाडी शहरावर आणि मोती तलावावर ठेवली आहे. अशा या निसर्गरम्य शहरात असलेला सुंदर मोती तलाव पावसाळा सुरू होताच निर्मळ पाण्याने भरला. परंतु याच निर्मळ पाण्यात शहराच्या आजूबाजूच्या नाल्यांमधून वाहून आलेला कचरा आणि मोठ्या प्रमाणात बाटल्यांचा साठा तलावाच्या काही कोपऱ्यांमध्ये जमा झाला आणि तलावाला विद्रूप करू लागला. सावंतवाडी शहर नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात उभे राहिलेल्या काही इमारतींच्या ड्रेनेजचे पाणी बिल्डरांनी आजूबाजूच्या नाल्यांमध्ये सोडले आणि नाल्यांचे पाणी मोती तलावात वाहून येत असल्याने मोती तलावाचे पाणी दूषित होऊ लागले. याच नाल्यांमधून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा वाहून येतो आणि तो तलावात साचत असतो, त्यामुळे तलावाला विद्रूपीकरणाचे स्वरूप आले आहे.
सावंतवाडी नगरपालिकेवर गेले वर्षभर प्रशासकीय राजवट असून प्रशासकांच्या दुर्लक्षामुळे सावंतवाडीची शान असलेला मोती त्याला विद्रुप होत आहे. तलावाच्या कठड्याचे काम करताना खोदाई केलेली माती तलावातच राहिल्याने पुन्हा एकदा तलावाच्या काठाला मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झालेला आहे. प्रशासनाने कठड्याचे काम करताना कॉन्ट्रॅक्टर कडून योग्य रीतीने खोदाई केलेला गाळ काढून घेणे आवश्यक होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया समोरील कठड्याच्या कामाचा गाळ तलावातच राहिल्याचे दिसून येत आहे. गेली अनेक दशके सावंतवाडी शहराच्या सौंदर्याचा भार आपल्या खांदावर पेलत शहराला नावलौकिक मिळवून दिलेल्या मोती तलावाचे सौंदर्य आता तरी जपले जाईल का…?? सावंतवाडीकर नागरिक कधीतरी मोती तलावात होणाऱ्या प्रदूषणावर आवाज उठवतील का..??
असे प्रश्न आता मोती तलावच विचारू लागला आहे…