You are currently viewing आषाढातील एक दिवस

आषाढातील एक दिवस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललित लेख*

 

*आषाढातील एक दिवस*

 

आषाढ…! अंग अंग रोमांचित करणारा महिना… आषाढातील पावसाचे टपोरे थेंब अंगावर पडताच ग्रिष्माचा उकाडा सोसून, तापून लालेलाल झालेलं अंग शहारून येतं… सर्वांगावर काटा उभा राहतो.. विस्तवावर पाणी पडावं अन् उष्णतेच्या वाफा याव्यात तशा अंगातून वाफा निघतात…अन् तनमन गारेगार होऊन जातं…

*येरे येरे पावसा…*

*तुला देतो पैसा…*

*पैसा झाला खोटा…*

*अन् पाऊस आला मोठा*

अशी पावसाची गाणी गाऊन पावसाला खुश करण्याचे दिवस म्हणजेच आषाढ..! बालपणी अंगणातील वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणे…दूर दूर जाईपर्यंत कोणाची जोडी सहिसलामत जाते कोणाची डूबते याचा आनंद घेणे…ही मजा काही औरच असायची…

*ये गं ये गं सरी…माझे मडके भरी*

*सर आली धावून नि मडके गेले वाहून*

डोंगर माथ्यावरून बँडबाजा वाजवत…घर कौलांवर टपटप आवाज करत… पत्र्यांवर ताशा बडवत…अन् टपोऱ्या थेंबांनी झाडा पानांवरून खळखळून हसत..अंगणी मोतियांचा नाच करत…धावत येत सर कोसळायची…आणि पावळीस लावलेली घागर, कळशी वाहून जायची…तेव्हा मग उमजायचा या गाण्याचा अर्थ…!

जन्म आणि बालपण पांडवकालीन विमलेश्वराच्या सान्निध्यात देवगड तालुक्यात आजोळ असलेल्या वाडा या निसर्गरम्य गावात गेलं…उन्हाळी सुट्टीत हापूस आंब्याच्या बागांमध्ये रमायचे आणि पावसाळ्यात शेती म्हणजे चिखलधुनीच… नांगरणी, तरवा काढणी आणि भात लावणी म्हणजे आनंदाला पारावार नसायचा…पावसाळ्यात सकाळची शाळा सुटली की शेताकडे जायचे…नांगरणी करताना कोपरे खणणे, शेलण्याने पाणी नसलेल्या जागी पाणी मारणे ही आवडीची कामं… गावात ओळख होती ती भाचा म्हणून… आणि भाचा मामाला मदत करतो म्हटल्यावर गावातील कुणीतरी गंमतीने चिडवायचे… असंच एकदा गावातील एका आजीच्या वयाच्या बाईने शेलण्याने पाणी टाकत असताना मला चिडवलं… झालं, रागाला डोळे नसतात हे खरे… त्याच शेलण्याने चिखल उडवून रागाच्या भरात त्या आजी बाईला मी चिखलाने भिजवून काढलं… गेल्या वर्षीच त्या आजीबाई निवर्तल्या…पण म्हातारी झाल्यावरही ओळखत होत्या तोपर्यंत मी चिखलाने भिजवलेली आठवण मात्र दरवेळी सांगत असायच्या. प्राथमिक शिक्षण सावंतवाडीत झालं… मिलाग्रीस शाळा म्हणजे जिल्ह्यात नावाजलेली. शाळेत जायला घराकडून पक्के डांबरी रस्ते परंतु जवळचा रस्ता म्हणून आणि पाण्यातून जाण्याचा आनंद घेण्यासाठी ओहळातून जाणाऱ्या रस्त्याला आमची पहिली पसंती.. ओहळाच्या पाण्यात पायाचा चावा घेणारे मासे..पायावरील मळ काढताना पायाला गुदगुल्या व्हायच्या…तेव्हा विलक्षण आनंद व्हायचा…

मुंबईत नोकरीला असताना आषाढातील एक रविवार ठरलेला असायचा तो पावसाळी सहलीचा… ऑफिस मधील तरुण मुले, मुली मुंबईच्या बाहेरील म्हणजे बदलापूर, टिटवाळा आदी ठिकाणच्या आसपास डोंगर कपारीत लपलेल्या धबधब्यावर जायचो… दिवसभर पावसाचे थेंब अंगाखांद्यावर झेलत चिंब भिजणे… कधीही न पाहिलेल्या अनोळखी खेड्यातील कधी डांबरी तर कधी मळलेली लाल मातीची वाट पायाखाली घालीत…एकमेकांच्या हातात हात देत…एक दुसऱ्याची मस्करी करत चालायचो. पावसात अचानक सूर्याची सोनेरी किरणं दिसावीत अन् वातावरण बदलून जावं तसेच चालता चालता मध्येच कुणीतरी चुटकुल्यांची बरसात करत…मग हास्याचे कारंजे हवेत उडवित…गवताच्या पातीवरील मोत्यासारख्या चमकणाऱ्या पावसाच्या थेंबाना पायांनी तुडवीत निघायचो…कुणीतरी संगीताचा सूर लावत आशा, लता, रफी, किशोर आपलेच सांगाती असल्यासारखे गायचे आणि आनंदाची उधळण करत डोंगराच्या कुशीत लपलेल्या धबधब्यावर पोचायचो… डोंगर कपारीत दहा पंधरा फुटांवरून कोसळणारा धबधबा आणि खडकात असलेला मोठा खड्डा…त्यातील थंडगार पाण्यात दिवसभर डुबक्या मारून आनंद उपभोगायचो… पंचपक्वांनापेक्षा कधी कधी देवाच्या देवळात वाढलेला डाळ भात, खिरीचा महाप्रसाद सर्वात जास्त चविष्ट लागतो…अगदी तसंच वाटायचं छोट्याशा धबधब्यावर आनंद लुटताना… अन् मग वेळ असायची ती सायंकाळी आनंदाच्या सरी अंगावर झेलत पुन्हा चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवित परतीच्या प्रवासाला निघायची…मुंबई सारख्या ठिकाणी छोटासा धबधबा सुद्धा मनाला आनंद देऊन जायचा..कामाचा शीण घालवायचा.

सावंतवाडी तालुक्यातील आंबोली सारख्या निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणाच्या पायथ्याशी राहणारे आम्ही…! पावसाळ्यात कित्येकदा उंचावरून फेसाळत कोसळणाऱ्या धबधब्याचा आनंद आषाढात पावसात घेतो… आंबोलीच्या उंच खडकांच्या कड्यावरून कोसळणारे पाणी म्हणजे जणू शुभ्र वस्त्र परिधान केलेले जल कोसळताना अलगद आपल्या सर्वांगावर मालिश करत असंच वाटतं…खडकांवर कोसळणारे पाणी अन् खडकांवरून उडणारे पाण्याचे तुषार आल्हाददायक अवर्णनीय…! कित्येकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात… महादेव गड पॉइंट वरून दिसणारे निसर्गाचे रूप म्हणजे जणू आपण आसमंतात राहतोय अन् कापसासारखे पिंजलेले शुभ्रधवल ढग आपल्या आसपास फिरतात.. बागडतात असाच आभास होतो… दूर दूर खोलवर दरीतून वर वर येणाऱ्या वाफा अंगाला स्पर्शून जातात ते क्षण म्हणजे स्वर्ग सुखंच…! कावळेसाद पॉइंटवरून उंचावरून फेसाळत शेकडो फूट खोल दरीत कोसळणारे धबधबे पाहणे अन् त्यांचे शब्दात वर्णन करणे देखील अतिशयोक्ती वाटावी असेच…! उंचावरून दरीत झेपावणारे पाणी दरीच्या कोनाकोनातून वर येणाऱ्या वाऱ्याच्या झोताने पुन्हा वर वर उलटे माघारी येते तेव्हा वाटते…जणू आपल्यापासून दूर जाणारी प्रेयसी पुन्हा आपल्याशी बोलण्यासाठीच माघारी फिरते आहे… हे नेत्रसुख घेणे म्हणजे पर्वणीच…!

आषाढात आंबोलीच्या दऱ्याखोऱ्यात हिरवाईची लयलूट असते..जणू धरणीने हिरवागार शालू परिधान केला अन् पावसाला आपल्या मिठीत सामावून घेतलं…पावसाच्या सरीवर सरी कोसळत असताना धरित्री यौवनात आलेल्या नवतरुणी सारखी बेधुंद होऊन चिंब भिजते…अन् पानापानांवर..गवताच्या पात्यांवर पावसाचे थेंब खदखदून हसतात…क्षणार्धात मातीत मिसळतात…धरणीशी एकरूप होतात…तो अवर्णनीय नजारा आषाढातील दिवसात कित्येकदा आंबोलीच्या दऱ्याखोऱ्यांत अनुभवतो…आणि एक दिवस निसर्गा संगत जगतो..!!

 

© दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा