माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले म्हणजे एकेकाळी शरद पवार यांचे कोकणातील विश्वासू सहकारी…! शरद पवार यांच्या याच विश्वासाच्या जोरावर प्रवीण भोसले यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम केले होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर प्रवीण भोसले यांनी लोकांच्या नजरेत येईल असे स्वतःसाठी सुद्धा काही केले नाही आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा काही केले नाही अशी चर्चा नेहमी असायची. आपल्या राजकीय कारकीर्दीत एखादी शैक्षणिक संस्था जरी प्रवीण भोसले यांनी सुरू केली असती तरी आज राजकीय प्रवाहात प्रवीण भोसले हे नाव धबधबा निर्माण करून राहिले असते.
सावंतवाडीचे नाम.दीपक केसरकर हे प्रवीण भोसले यांचेच बोट धरून राजकारणात आले. प्रवीण भोसले यांना मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही, परंतु त्यांचेच बोट धरून राजकारणात आलेल्या नाम. दीपक केसरकर यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून आपला राजकीय प्रवास चढत्या आलेखाप्रमाणे करत यशोशिखर गाठले. तब्बल तीन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून येत महाराष्ट्राच्या विधानसभेवर आमदार म्हणून गेले आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोन वेळा मंत्री होण्याची संधी साधली. नाम.दीपक केसरकर हे राजकारणात मोठे होत असताना प्रवीण भोसले यांनी त्यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानली. त्यातूनच ते मध्यंतरीच्या काळात नाम. नारायण राणे यांच्या जवळ गेले. नारायण राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित आनंद मेळाव्यामध्ये प्रवीण भोसले यांनी नारायण राणे आणि इतरांना खुश करण्यासाठी नाम.दीपक केसरकर यांची मिमिक्री केली होती. तेव्हापासून प्रवीण भोसले हे बदलत्या राजकारणात चेष्टेचा विषय बनून राहिले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेस यांची सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित झाली. त्यावेळी पुन्हा एकदा नाम. दीपक केसरकर व प्रवीण भोसले हे एकत्र आल्याचे चित्र सर्वांना पाहायला मिळाले. त्यामुळे केसरकर व प्रवीण भोसले यांच्यात दिलजमाई झाली अशी चर्चा मीडिया मधून रंगविली गेली. महाविकास आघाडी तुटली परंतु नामदार दीपक केसरकर हे सत्ताधारी शिवसेनेच्या शिंदे गटात गेले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. परंतु त्यानंतर मात्र प्रवीण भोसले आणि केसरकर यांच्या पुन्हा एकी झाली नाही.
ज्याप्रमाणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बाजूला ठेवत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह वेगळा गट स्थापन करून शिवसेनेची चावी आपल्या हाती ठेवली; त्याचप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये देखील असेच नाट्य रंगले आणि राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना बाजूला ठेवत जवळपास 36 ते 40 आमदारांचा गट वेगळा पाडून शरद पवार यांचे पुतणे नामदार अजित पवार यांनी राष्ट्रवादीची चावी आपल्या हाती घेतली. पक्षाध्यक्ष शरद पवार एकाकी पडल्याचे चित्र समोर येताच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत व कोकण विभागच्या महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची पाठराखण करत त्यांच्यासोबतच राहण्याचे ठरविले; परंतु प्रवीण भोसले यांनी एवढ्यावरच न थांबता थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत त्यांच्यासोबत फोटो काढला आणि मीडियामध्ये प्रसिद्ध करून स्वतःला राष्ट्रवादीचा कट्टर कार्यकर्ता असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे एकेकाचे राज्यमंत्री आणि जेष्ठ कार्यकर्ते म्हणून प्रवीण भोसले यांची सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी मध्ये नक्की भूमिका काय..? हे मात्र आजपर्यंत कोणालाही समजू शकलेले नाही. आज 11 जुलै रोजी राष्ट्रवादीचे प्रतोद आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सिंधुदुर्ग दौरा होत असल्याने कुडाळ येथे आयोजित मेळाव्यासाठीच्या तयारी करीता सावंतवाडी कार्यकारणीची बैठक आयोजित केली होती. ही बैठक तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार प्रवीण भाई भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष अमित सामंत व कोकण विभागच्या महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या सूचनेनुसार आयोजित केल्याचे म्हटले आहे. एकेकाळी शरद पवार यांचे कोकणातील विश्वासू नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री असलेले प्रवीण भोसले हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनात कनिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काम करतात …?? हे न सुटणारे कोडे आहे. त्यामुळे प्रवीण भोसले यांचे राष्ट्रवादीतील नेमकी भूमिका कोणती असा प्रश्न उपस्थित होत आहे.