*विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेत उतरावे – आ. वैभव नाईक*
*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न*
*वृक्षारोपण, विद्यार्थी गुणगौरव,अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन, माजी विद्यार्थी व प्रतिथयश मान्यवरांचा सत्कार*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेला ६९ वर्षे पूर्ण झाली असून या संस्थेला एकत्र ठेवण्याचे काम अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. त्यामुळे हि संस्था नावारूपास येत आहे. संस्थेसाठी सर्व संचालकांनीही मोठे योगदान दिले आहे. सर्व संचालक, माजी विद्यार्थी यांच्या एकत्रित विचाराने चालणारी ही एकमेव संस्था आहे. या संस्थेची पुढील वाटचाल निश्चितच यशस्वी होईल. विद्यार्थ्यांनीही जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेत उतरले पाहिजे. परीक्षांची चांगली तयारी केली पाहिजे. जीवनात जे काही बनाल ते सर्वोत्तम बना असा मौलिक संदेश आमदार वैभव नाईक यांनी दिला.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा ६९ वा वर्धापनदिन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, नीती आयोग भारत सरकार द्वारा प्राप्त अटल टिंकरिंग लॅबचा उद्घाटन समारंभ व प्रतिथयश मान्यवरांचा सत्कार समारंभ रविवारी उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, सुझा रासम आणि कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट तुकाराम रासम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष पद क.ग शि.प्र. मंडळ, मुंबई संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी भूषविले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली. तद्नंतर आ. वैभव नाईक आणि तुकाराम रासम यांच्या शुभहस्ते नीती आयोग भारत सरकार द्वारा प्राप्त अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन करण्यात आले. इ. १० वी व १२ वी परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केलेल्या प्रशालेतील २ विद्यार्थ्यांचा आणि क्रीडा तसेच नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर प्रशालेचे माजी विद्यार्थी व प्रतिथयश व्यावसायिक बाळकृष्ण जगन्नाथ सावंत, शशांक मुकुंद बेळेकर तसेच पोलिस हवालदार निलम कृष्णकांत कदम यांचा सत्कार आ. वैभव नाईक आणि तुकाराम रासम यांच्या हस्ते करण्यात आला.
कितीही खडतर परिस्थिती समोर आली तरी डगमगून न जाता परिस्थितीवर मात करून यशस्वी व्हा असे मार्गदर्शन तुकाराम रासम यांनी केले.
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आपल्याला लाभलेल्या उत्कृष्ट अध्यापकांकडून जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करा असे संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाला कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे उपाध्यक्ष पी. डी. सावंत, संचालक संदेश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समितीचे चेअरमन आर. एच. सावंत, खजिनदार गणपत सावंत व सर्व सदस्य, सांगवे सरपंच संजय सावंत, भिरवंडे सरपंच सुजाता सावंत, खलांतर – गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे व उपसरपंच बाळा सावंत, कुंभवडे सरपंच सूर्यकांत तावडे, हरकुळ बुद्रुक सोसायटी चेअरमन डॉ.आनंद ठाकूर, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, पत्रकार तुषार सावंत, रत्नाकर सावंत, तुषार सावंत, प्रमोद सावंत, जयवंत सावंत, सुनिल सावंत, माजी प्राचार्य ए. एस. सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क.ग.शि.प्र. मंडळाचे सरचिटणीस शिवाजी सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक प्रसाद मसुरकर व श्रीम. पल्लवी हाटले यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष पी. डी. सावंत यांनी आभार मानले.