You are currently viewing कट्टा नं. १ प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळले ; मुलांच्या जीवितास धोका निर्माण

कट्टा नं. १ प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळले ; मुलांच्या जीवितास धोका निर्माण

मशिवसेना ठाकरे गट आक्रमक:आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

मालवण

मालवण तालुक्यातील कट्टा येथील प्राथमिक केंद्रशाळा कट्टा नं. १ च्या इमारतीचे छप्पर कोसळले आहे. त्यामुळे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या छोट्या मुलांचा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. या इमारतीच्या छप्पराची दुरुस्ती तातडीने करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख देवदास रेवडेकर यांनी दिला आहे.

दरम्यान, कट्टा (गुरामवाडी) ग्रामपंचायतीवर गेली २५ वर्षे नारायण राणेंच्या विचाराची म्हणजेच भाजपाची सत्ता आहे. या भागातील जिल्हा परिषद सदस्य देखील भाजपचे आहेत. तरीही सत्ताधारी भाजपच्या काळात कट्टा गावचा विकास होण्याऐवजी भकास होत असल्याचे दिसून येत असल्याचेही देवदास रेवडेकर यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे ग्रा. प. सदस्य वंदेश ढोलम, दर्शन म्हाडगूत, शेखर रेवडेकर, जगदीश मोरजकर, गणेश गाड, सुरेंद्र बोडये, निखील बांदेकर, संकेत अमरे व अन्य पालक उपस्थित होते.

कट्टा केंद्रशाळेची इमारत ही फार जुनी आहे. तरीही इमारत मात्र मजबूत आहे. पण इमारतीचे छप्पर काही काही ठिकाणी मोडकळीस आले आहे. तर काही वर्गखोल्यांचे छप्पर कोसळले आहे. यामुळे इमारतीसही धोका निर्माण होऊ शकतो. या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण दिले जाते. मग एवढ्या लहान लहान मुलांच्या बाबतीत जर अपघात घडला तर याला जबाबदार कोण? पालकांनी आणि आम्ही याचा जाब नेमका कुणाला विचारायचा? कारण सत्ताधारी बोट दाखवणार शासनाकडे आणि शासन अडकलेले असणार कागदपत्रांमध्ये मग करायचे काय? खर तर याबाबत पावसाळ्यापूर्वी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे होते. पण सत्ताधाऱ्यांनी मात्र याबाबत गांभीर्याने विचार न करता ते सुशेगात राहिले. सध्या पावसाचा जोर कायम सुरू आहे. त्यात सोसाट्याचा वारा सुरू असतो. त्यामुळे जर काही अघटीत घटना घडली तर सत्ताधारी आणि शासन यांनी याद राखा तुमच्या विरोधात असे तीव्र आंदोलन छेडू की तुम्हाला पळता भुई थोडी होईल, असा इशारा देतानाच तातडीने यावर उपाययोजना करा आणि कार्यवाही करा अशी मागणी शाखा प्रमुख रेवडेकर यांनी म्हटले आहे.

ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली ती नेमकी कशासाठी जनतेची कामे करण्यासाठी की भाजपचा हात धरून चालणाऱ्या ठेकेदारांची पोट भरण्यासाठी असा सवालही शाखाप्रमुख श्री. रेवडेकर यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा