कुडाळ
अबिद नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सदस्यच नव्हते, असा मोठा गौप्यस्फोट आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के राष्ट्रवादी कार्यकर्ते पक्षप्रमुख शरद पवारांसोबतच आहेत असा दावा सुद्धा अध्यक्ष अमित सामंत यांनी केला आहे.
२ जुलै रोजी अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका आज अमित सामंत यांनी स्पष्ट केली. सिंधुदुर्ग जिल्हा हा पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता आणि भविष्यातही पाठीशी उभा राहील. ते जी दिशा दाखवतील त्यावर सिंधुदुर्गातील राजकारण चालेल असे सुतोवाच सुद्धा अमित सामंत यांनी केले.
यावेळी अमित सामंत म्हणाले की, दुसऱ्या दिवशी पक्षाचे प्रतिज्ञापत्र भरलेले लोक अजित पवार यांच्याकडे गेले. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कारवाईचे आधीच संकेत दिले होते. ज्या सात जणांची हकालपट्टी राष्ट्रवादी काँग्रेसमधून करण्यात आली त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जाऊन दाद मागावी. हकालपट्टी केलेली कारवाई चुकीची आहे हे त्यांनी पटवून द्यावे, असेही ते म्हणाले.
अजित पवार यांच्याशी भेटलेले ५४ कार्यकर्ते असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, प्रत्यक्षात ७ जण क्रियाशील सदस्य आणि पदाधिकारी अजित पवार यांना भेटले. बाकीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नव्हते. जे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत पदाधिकारी आहेत त्यांची जिल्ह्यातील संघटनेत नोंद आहे. पक्षाच्या स्थापनेपासून जे आहेत त्यांना घटना पक्षाची माहित आहे.
अबिद नाईक हे राष्ट्रवादीचे क्रियाशील सदस्यच नव्हते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आमच्या पक्षात फूट नसून हा छोटासा कपचा उडाला आहे असेही ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, अनंत पिळणकर, बाळ कनयाळकर, भास्कर परब, नझीर शेख, सावली पाटकर, सचिन पाटकर आदि उपस्थित होते.