You are currently viewing रेडी येथील जुगार अड्ड्यावर काल रात्री झाला राडा

रेडी येथील जुगार अड्ड्यावर काल रात्री झाला राडा

*नाम.दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात अवैध धंदे जोरात*

 

रेडी येथील उषा नगर परिसरात गेले काही महिने जुगाराच्या बैठका बसत असून राजकीय आश्रय मिळाल्यामुळे अगदी निर्धास्तपणे नेहमी या जुगाराच्या बैठका बसत असतात. काल रात्री नेहमीप्रमाणे बसलेल्या बैठकीत जोरदार हाणामारी झाल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून समजते.
रेडी येथील जुगाराच्या बैठका बसण्याच्या ठिकाणी असलेल्या एका देवस्थानचे मानकरी चार “आणे” यांना खाकी वर्दीप्रमाणेच जुगारी ७००/- रुपये हप्ता देतात; परंतु आपल्याला मिळालेला ७००/- रुपये हप्ता चार “आणे” हे काल झालेल्या जुगाराच्या खेळात हरले. हप्त्यापोटी आपल्याला मिळालेले सातशे रुपये जुगारात हरल्यानंतर चार”आणे” आक्रमक झाले आणि जुगाराच्या मैफिलीमध्ये त्यांनी जोरदार हाणामारी केली. या मारामारीत सोड्याच्या बाटल्या देखील फोडल्या, त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या घटनेनंतर रात्री १०.०० वाजता जुगाराची मैफिल बंद करण्यात आली.
जुगाराच्या या अवैद्य धंद्यात काहीजण बक्कळ पैसा कमावतात तर काही कफल्लक होतात आणि नैराश्य येऊन नंतर मनावर ताबा न राहिल्याने अशा प्रकारच्या हाणामारीच्या घटना होतात. त्यातून एखाद्याचा भोसकून जीव देखील जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाम.दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील रेडी हा भाग असून नामदार दीपक केसरकर राज्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये गुंतले असताना त्यांच्या मतदारसंघात खाकी वर्दीच्या आशीर्वादावर आणि राजकीय आश्रय मिळाल्यामुळे जोरदार जुगाराच्या बैठका सुरू असतात. त्यामुळे रेडी व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना नामदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात नक्कीच चाललंय तरी काय..? असा प्रश्न पडलेला आहे. एकेकाळी विकासाच्या वल्गना करणाऱ्या नाम.दीपक केसरकर आपल्या मतदार संघात सुरू असलेल्या अवैद्य धंद्याच्या विकासावर कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा