विद्यार्थ्यांना आपल्या क्षमता ओळखता आल्या पाहिजेत – डॉ. रुपेश पाटकर
बांदा
व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल प्रशालेत बांदा पंचक्रोशीतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ रुपेश पाटकर यांनी कुमारवयीन विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले.
आपल्या या मार्गदर्शक वर्गा दरम्यान त्यांनी विविध विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध उदाहरणे देऊन त्यांनी आपले विषय मांडले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यानी आपल्या क्षमता ओळखल्या पाहिजे, त्यांचे रूपांतरण करून त्या विकसित केल्या पाहिजे. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. त्याचप्रमाणे आपल्या मर्यादा ओळखून वागले पाहिजे. तसेच त्यांनी अल्कोहोल व सबस्टन्स डिपेंडन्स सिंन्ड्रोम या आजाराविषयी माहिती दिली. या आजारामुळे अनेक कुमारवयीन मुले, प्रौढ व्यक्ति दारूच्या आणि सिगारेटच्या आहारी जातात व मरण पावतात . समाजातील विविध उदाहरणे देऊन देऊन सांगितले की या आजाराचे निदान नाही पण दारू आणि सिगारेट पासून दूर राहून आपण हे आजार टाळू शकतो. याचबरोबर आपल्या चांगल्या गोष्टींसाठी आपण ठाम राहिले पाहिजे. असाही सल्ला दिला.
त्यानंतर त्यांनी सोशल मीडिया वरील उदाहरणांवरून प्रेम, वासना व आकर्षण या मधील फरक समजावून सांगितला. आपल्या व्यक्तीचे चांगले व्हावे असे वाटणे म्हणजे प्रेम, पण एखादी व्यक्ति हवी हवीशी वाटणे, सतत तिचा विचार असणे फसवणूक झाल्यावर मग अस्वस्थपणा वाटणे हे आकर्षण. आकर्षण ही नैसर्गिक भावना आहे. हा गुन्हा नाही पण आपल्याला यातला फरक कळला पाहिजे. आपण आपल्या भावना ओळखणे, त्या समजावून घेणे तसेच समोरच्याच्या भावना ओळखून आपण स्वतःचा बचाव करू शकतो असेही डॉ पाटकर म्हणाले.
चांगल्या शब्दात हसत खेळत डॉ पाटकर यांनी महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले या बद्दल त्यांचे आभार प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीमती रसिका वाटवे यांनी मानले . सदर मार्गदर्शन वर्गास प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ शिल्पा कोरगावकर तसेच इतर शिक्षकही उपस्थित होते.