पुणे :
भारतातील कोरोना प्रतिबंधक लस तयार करणारी कंपनी सिरम इंस्टिट्युट आणि भारत बायोटेक यांनी आपल्या लसीची तयारी सुरु केली आहे. आतापर्यंत 6 कोटी डोस सिरम इंस्टिट्युटने तयार केले आहेत, तर भारत बायोटेकनेही आपल्या लसीचे उत्पादन सुरू केले आहे. भारतात कोरोना लस तयार होण्याबरोबरच रशियाची स्पुतनिक -5 ही लसही भारतात दाखल झाली असून त्याचे लवकरच उत्पादन सुरू केले जाऊ शकते.
अनेक कोरोना लस येत्या काही महिन्यांत बाजारात उपलब्ध होऊ शकतात. याबाबत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात देशातील 30 कोटी लोकांना सर्वात आधी कोरोना लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत 155 कोरोना प्रतिबंधक लसींवर जगभरात काम सुरू आहे. यातील 47 लस या अंतिम टप्प्यात असून जगभरातील फार्मा कंपनीमध्ये भारतातील भारत बायोटेक, फायझर, ऑक्सफर्ड आणि स्पूतनिक-5 सारख्या लसींचा समावेश आहे. फायझर ही लस आता 90 टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.
भारतातील प्रत्येक नागरिकाला एक डोस द्यायचा असेल तर किमान 130 कोटींपेक्षा जास्त डोस लागणार असल्यामुळे त्याचा खर्च आणि उत्पादन हे आव्हान मोठे असणार आहे. हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावे लागणार असून तेवढा वेळ लसीकरणासाठी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.