You are currently viewing गुरुचे गुरुपण ध्यानी घेऊन जीवनाची वाट चोखाळावी

गुरुचे गुरुपण ध्यानी घेऊन जीवनाची वाट चोखाळावी

सौ. मेधा शेवडे; भंडारी हायस्कुलमध्ये गुरु माता, पालक व शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडून पाद्यपूजन

मालवण

जीवनाची मार्गक्रमणा करत असताना ज्या अनेक अडचणी येतात, आपल्या मार्गात जे खाचखळगे असतात ते पार कसे करावे याचे सामर्थ्य आपल्याला गुरु हा देत असतो. माता, पिता, शिक्षक हे जसे आपले गुरु आहेत, तसेच आपला देशही एक प्रकारे गुरु असल्याने गुरुजणांना विसरू नका. शिष्याचे जीवन चांगल्या प्रकारे व्यथित व्हावे यासाठी गुरु प्रयत्न करीत असतो. गुरु हा आपल्याला आचार, विचार देऊन एक प्रकारे आपल्या जीवनाला आकार देत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुरुचे गुरुपण ध्यानी घेऊन जीवनाची वाट चोखाळावी, असे प्रतिपादन शिवाजी वाचन मंदिर मालवणच्या अध्यक्षा सौ. मेधा शेवडे यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी एज्यु. सोसा. हायस्कुल येथे गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून प्रशालेत गुरु, माता पालक तसेच शिक्षक यांचा पाद्यपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून शिवाजी वाचन मंदिर मालवणच्या अध्यक्षा सौ. मेधा शेवडे या उपस्थित होत्या. तसेच व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक एच. बी. तिवले सर, आर. डी. बनसोडे, सहाय्यक शिक्षक आर. बी. देसाई, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, सहाय्यक शिक्षिका कुमारी सुनंदा वराडकर आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी सौ. शेवडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच सरस्वती माता व व्यास मुनींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापक श्री. एच. बी. तिवले सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर आर. बी. देसाई आणि सुनंदा वराडकर यांनी कार्यक्रमाचे महत्व विषद केले.

यावेळी बोलताना सौ. मेधा शेवडे म्हणाल्या, जीवनात गुरु असणे आवश्यक आहे, गुरु सर्वांगीण ज्ञान आपणास देत असतो, अज्ञानरुपी अंधारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेण्याचे काम गुरु करतो, असेही त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर यांनी गुरु जवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय त्यांना ज्ञान मिळत नाही. आपल्यामध्ये लिनता, नम्रता असेल तर गुरुचा आशीर्वाद कायम राहतो. विद्यार्थ्यांनी वडिलधाऱ्या माणसांचा मान राखावा, असे सांगितले.

यावेळी प्रशालेच्या गुरु माता तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांची पाद्यपूजा उपस्थित विद्यार्थ्यांनी करून गुरुपौर्णिमा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली. तसेच गुरुप्रति आपल्या भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आर बी देसाई,अरविंद जाधव, विलास वळंजू, सौ.अस्मिता वाईरकर यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रफुल्ल देसाई यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा