“बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना”
सिंधुदुर्ग राष्ट्रवादीत अस्वस्थता…*पदाधिकारी नॉट रीचेबल
विशेष संपादकीय…
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सरकारमध्ये सामील झाले. सोबत राष्ट्रवादीच्या आणखी आठ प्रमुख नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेत महाराष्ट्रातील जनतेला धक्काच दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे तब्बल ४० आमदार असल्याचे समजत असून,आज राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, सुनील बनसोडे, अनिल भाईराव पाटील अशा प्रमुख नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पाच वर्षाच्या एका आमदारकीच्या कारकीर्दीत तीन वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून तीन वेळा शपथ घेणारे कदाचित पहिलेच मंत्री असतील अजित पवार…!
शिवसेना पक्ष फुटून एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करत महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडून भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले होते. त्यावेळी शिंदे यांनी बाहेर पडताना शिवसेनेने राष्ट्रवादीशी केलेली सलगी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्याची तक्रार केली होती. परंतु महाराष्ट्राच्या सरकार मध्ये आज घडलेल्या नाट्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शिवसेना भाजप युतीच्या युतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेल्या अजित दादा पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे यांच्यासोबतच नवे सरकार पुन्हा एकदा स्थापन होताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात “कोण कधी कोणावर बोट दाखवेल आणि कोण कधी कोणाचं बोट धरेल” हे मात्र कोणी ज्योतिषी सुद्धा सांगू शकत नाही हे अधोरेखित झाले आहे.
एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याने शिवसेनेने २० जून रोजी आपला वर्धापन दिन साजरा केला होता. यावेळी शिवसेना पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपला वर्धापन दिन साजरा करत असतानाच ज्या राष्ट्रवादीचे कारण सांगून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंड करत वेगळा गट स्थापन करून भाजपच्या सोबत सरकार स्थापन केले त्या राष्ट्रवादीने “गद्दार दिन” म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे “खोके आंदोलन” केले होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत महिला आघाडीच्या नेत्या अर्चना घारे-परब आदी प्रमुख नेते सामील झाले होते. राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेने गद्दारी करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडले या कारणासाठी घोषणाबाजी करून शिंदे सरकार सह शिवसेनेच्या फुटीर आमदारांची हुर्यो उडवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुडाळ येथील आंदोलनाला दहा-बारा दिवस उलटले न उलटले महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये धक्कादायक अशी घडामोड घडली असून राष्ट्रवादीचेच प्रमुख नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडून तब्बल ४० आमदारांसह महाराष्ट्राच्या युती सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख अशा सर्वच नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये सामील होणे का आवश्यक समजले..? हा मात्र राष्ट्रवादीच्याच नव्हे तर इतर पक्षांच्या नेत्यांनाही न उलगडणारा प्रश्न आहे. परंतु राष्ट्रवादीच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी दुसऱ्या पक्षाच्या फुटीबद्दल कुडाळ येथे केलेले आंदोलन म्हणा किंवा लोकांचे मनोरंजन आणि स्वतःचा तमाशा म्हणजे *”बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना”* असेच होते की काय..? अशी चर्चा आज रंगताना दिसून येत आहे. कारण आज त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांसोबत गद्दारी करून शिवसेना भाजपा सोबत सरकारमध्ये सामील झाले; त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेत्यांची परिस्थिती *”करूक गेलो तुका आणि झाला माका”* अशीच झाली आहे. जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांना यामुळे जबर मानसिक धक्का बसला असून काहींना तर अश्रू आले तर काहीना हसावे की रडावे हेच समजत नव्हते. सिंधुदुर्ग राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली असून शरद पवार समर्थक द्विधा अवस्थेत सापडले आहेत. अजित पवार समर्थकांकडून कणकवली शहरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तर सावंतवाडीतील मूळ रहिवासी आणि पुणे स्थित अजित पवार समर्थक भावी आमदार राष्ट्रवादीच्या अर्चना घारे परब नॉट रीचेबल झाल्या आहेत.
केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांच्या ईडीच्या मार्फत चौकशा लावल्या गेल्या. त्यामुळे गेली अनेक वर्षे राजकारणात बस्तान बसविलेल्या नेत्यांचे धाबे दणाणले. त्यातील कित्येकांनी भाजपामध्ये सरळ प्रवेश करणे किंवा भाजपाचा झेंडा खांद्यावर घेत आत्मसमर्पण केले तर काहींनी भाजपाला आपला पाठिंबा जाहीर करत भाजपा सोबत राहिले. महाराष्ट्रात झालेली आजची घडामोड म्हणजे इडीचा धसका की मोदी सरकार विरोधात देशात विरोधी पक्षांची बांधली जाणारी मोट कमकुवत करणे..? असेच प्रश्न अनेकांच्या मनात उत्पन्न होत आहेत.