कुडाळ :
“समाजातील विविध कमकुवत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब कुटुंबातील व्यक्तींना मोफत कायदेविषयक सेवा पुरविण्याचे कार्य विधी सेवा प्राधिकरणाकडून करण्यात येते.” विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987 च्या तरतुदीनुसार राष्ट्रीय पातळीपासून ते तालुका पातळीपर्यंत विधी सेवा प्राधिकरण व समितीची स्थापना करण्यात आली. संविधानाच्या निर्देशानुसार लाभधारकांना विविध कायदे, त्यांना घटनेद्वारे प्राप्त अधिकार व कर्तव्य यांची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन होऊन त्यांच्यावर अन्याय झाल्यास न्याय कसा प्राप्त करावा यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी कायदेविषयक शिबिरे, चर्चासत्रे, कार्यशाळा या माध्यमातून लोकांमध्ये कायदयासंबंधी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने लोकअदालतींचे आयोजन करणे व सामाजिक व आर्थिकदृष्टया दुर्लभ घटक व गोरगरिबांना मोफत विधी सेवा व सहाय्य पुरविणे हे विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख उद्देश आहेत. या प्राधिकरणांकडून लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती निर्माण व्हावी म्हणून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत, वंचित घटकांपर्यंत, मानसिक आजाराने त्रस्त असलेले लोक, जेलमधील कैदी, अशा सर्व घटकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. सिंधुदुर्ग चे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे भारुका जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष व डी. बी. म्हालटकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी ऐश्वर्य मांजरेकर यांची नियुक्ती केली असुन याआधी ऐश्वर्य मांजरेकर यांनी केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्र मध्ये मालवण तालुका समन्वयक म्हणुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तम कामगिरी केली. तसेच ते व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळ चे विद्यार्थी आहेत. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांची निवड झाल्याबद्दल समस्त सिंधुदुर्गवासियांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.