You are currently viewing अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

मसुरे :

 

गुरुंचे गुरु, सदगुरुंचे गुरु, अक्कलकोट येथील वटवृक्ष निवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज होय. सर्व ब्रम्हांडाचे गुरु असलेल्या स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष मंदिरात गुरु पौर्णिमेचे विशेष महत्व आहे.

गुरुपौर्णिमेच्या या महतीमुळेच या दिवशी प्रचंड मोठया संख्येने भाविक स्वामींच्या दर्शनाकरीता पहाटे ४ वाजल्यापासूनच गर्दी करतात अशी माहिती मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सव सोमवार दि.३ जुलै रोजी आहे. या दिवशी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील नित्यनियमाने होणारी काकड आरती पहाटे ५ वाजता होईल. दर्शनाकरीता या दिवशी स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी होणार आहे.

स्वामी भक्तांची संभाव्य गर्दी पाहून सर्व स्वामी भक्तांना विशेष दर्शन रांगेची सोय करण्यात आली असून या दर्शन रांगेतूनच स्वामी भक्तांना स्वामी दर्शनास सोडण्यात येईल. स्वामी भक्तांच्या संभाव्य गर्दीमुळे सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता स्वामी भक्तांचे नित्य नियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. या दिवशी जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना प्रसाद मिळेल.

दुपारी ११:३० वाजता चोळप्पा महाराजांचे वंशज पुरोहीत मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींना महानैवेद्य दाखवून नैवेद्य आरती संपन्न होईल व शेजारती रात्री ७:४५ ते ८:४५ यावेळेत संपन्न होईल.

गुरूपौर्णिमेनिमीत्त दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या वतीने मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे सर्व स्वामी भक्तांसाठी भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. तरी सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा, भोजन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा