You are currently viewing प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्ताने….

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्ताने….

*स्पर्धात्मक परीक्षेतून करिअरचा प्रकाशमार्ग दाखवणारा दीपस्तंभ…*

 

सध्या तरुण पिढीला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध असले तरी नेमक्या कोणत्या मार्गाचा अवलंब करावयाचा याबाबत पालकांसकट त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला असतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम ते आपल्या सोयी नुसार करिअरचा मार्ग स्वीकारून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. मात्र ज्यांची आर्थिक, सामाजिक परिस्थिती अनुकूल नसते अशा ग्रामीण तसेच शहरी वस्ती पातळीवरील तरुण पिढीसाठी सन 2000 मध्ये मिशन आयएएस ही संकल्पना घेऊन डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही संस्था आपल्या स्वतःच्या घरी स्थापित करून होतकरू व गरीब मुलांसाठी २४ तास अभ्यासिका उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेला ध्यास हा महत्वाचा आहे आज मिशन आयएएसला २३ वर्षे पूर्ण झालेली आहे. संपूर्ण देशभरातून मिशन आयएएस ला मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. फक्त एक रुपयात स्पर्धात्मक परीक्षा बद्दलची सामग्री व मार्गदर्शन उपलब्ध करून देणारे व नवीन पिढीला स्पर्धात्मक परीक्षेतून आपल्या करिअरचा प्रकाशमार्ग दाखविणाऱ्या दिपस्तंभसारखे अखंड कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले सुपरिचित प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे हे आहेत.आज त्यांनी वयाची सत्तरी गाठली आहे. त्यांची देहबोली आजही चिरतरुणांना लाजवेल अशी आहे. प्रचंड सकारात्मक विचारांचा स्रोत घेऊन मिशन आय ए एस चे कार्य ते पुढे नेत आहेत. आज मिशन आय ए एस ही चळवळ बनली आहे. या चळवळीचे ते उत्तम संघटक आहेत असे मी मानतो.

कोविड काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बाहेरगावी गेलेले शेकडो विद्यार्थी अडकून पडल्याने मानसिक रित्या खचले होते,त्यांना धीर देण्यासाठी प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून झूम मीटिंग घेऊन अनेक सनदी अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले.यामधून अनेक विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळाला.

बारा तेरा वर्षांपूर्वी प्राध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर काठोळे सरांनी आपली पत्नी विद्या मॅडम यांच्या सहकार्याने मिशन आय ए एस चे कार्य गतीने वाढविण्याचे कार्य केले. सर्वप्रथम जिल्ह्यातील सर्व शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्व पटवून दिले. यासाठी तत्कालीन मंत्री व राज्यसभा खासदार मा. डॉ. अनिल बोन्डे यांनी चांगले सहकार्य केले. ही चळवळ गतिमान झाल्याने त्यांना, मध्यप्रदेश,छत्तीसगढ,बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात या राज्यातून मार्गदर्शनासाठी बोलावण्यात आले.या वयात दोघे पती पत्नी यांनी तब्येतीचे व वेळेचे नियोजन करून मिशन आय ए एस ची कीर्ती राज्याबाहेर पसरवली.

आजपावेतो या मिशन आय ये एस शी जुळलेल्या हजारो विद्यार्थ्यांना जवळ जवळ ३५० सनदी अधिकाऱ्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. देशातील २३ राज्यात जाऊन १५ हजाराचे वर मार्गदर्शनपर भाषणे दिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील सुलभ अशी एकूण ७३ पुस्तके लिहून प्रकाशितहीं केली.

दरवर्षी काठोळे सर ग्रीष्मकालीन सुट्टीत विद्यार्थासाठी संस्कार शिबिराचे आयोजन करतात.

राज्यात कोणतेही सरकार येवो त्यांचे कार्य सामाजिक भावनेतून निःस्वार्थ त्यागी वृत्तीने सुरूच राहणार आहे. त्यांची इच्छा हीच आहे की शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी मिशन आय ये एस सारखे उपक्रम शाळा कॉलेज मधून राबविले गेले पाहिजे. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. मागील महिन्यात नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी हा उपक्रम तात्काळ सुरु करावा असे आदेश शिक्षण विभागाला दिले तर काल अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडे यांनी सदरहू उपक्रम अमरावती विभागात सूरू करण्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ही फलश्रुती डॉ काठोळे सरांना एक दिलासादायक देणारी बाब आहे.

आज १ जुलै २०२३ सरांचा वाढदिवस. त्यांना मंगल दिनी खूप साऱ्या शुभेच्छा.

==============

रवींद्र दांडगे

जनसंपर्क अधिकारी

मिशन आय ए एस

अमरावती.

9404545238

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 20 =