दिवाळीच्या पाडव्यापासून मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे विरोधी पक्षांनं स्वागत केले. परंतु सरकारनं मंदिराच्या उघडणीचा निर्णय घेण्यास उशीर केला असल्याची टीकाही भाजप नेत्यांनी केली आहे.
राज्यातील मंदिरे लॉकडाऊननंतर भक्तांसाठी खुली करण्यात यांवी यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा हाती घेतला होता. संपूर्ण राज्यात घंटानाद आंदोलनही छेडलं होतं. सिद्धिविनायक मंदिराबाहेरही भाजपनं आंदोलन केलं होते. परंतु, राज्य सरकारकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव मंदिरांचा निर्णय घेण्यात येत नव्हता. मात्र, दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने मंदिरांसाठी परवानगी दिली आहे.
राम कदम यांनी ‘उद्या (सोमवारी) सकाळी ११ वाजता सिद्धिविनायक मंदिरात ढोल, ताशे वाजवत गुलाल उधळत, वाजत गाजत, नाचत दर्शनाला जाणार. महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारुण पराभव आणि महाराष्ट्र जनतेचा मोठा विजय झाला आहे. जल्लोष साजरा करणार,’ असं ट्विट केलं आहे.
‘मंदिरे व इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल’, असे मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केले होते. अखेर त्या ‘योग्य वेळे’ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. ही घोषणा करताना त्यांनी सावधानतेचा इशाराही दिला. ‘दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुराचा वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली, तरी वर्षभर करोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळुहळू थंड पडत असला, तरी बेसावध राहून चालणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले.