*स्थानिक खाकीच्या आशीर्वादाने रेडी येथे सुरू आहे जुगाराची बैठक*
स्थानिक खाकी वर्दीच्या आशीर्वादाने रेडी येथे जुगाराची बैठक आजही सुरूच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये नेहमीच जुगाराच्या बैठका बसतात, यापैकीच एक म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील रेडी उषा नगर येथे बसत असलेली जुगाराची बैठक. गेले दोन दिवस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बंद असलेली जुगाराची बैठक कालपासून रेडी येथे पुन्हा सुरू झालेली असून या बैठकीला राजकीय वरदहस्त असल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजते.
श्री गणेशाच्या कृपाशीर्वादाने आणि रेडी गावात असलेल्या मायनिंगच्या खाणीमुळे राज्यभरात नव्हे तर देश विदेशात रेडी गावाचा नावलौकिक आहे. अशा या श्री गणेशाच्या पावन भूमीत नाम.दीपक केसरकर यांना मानणारा देखील फार मोठा चाहता वर्ग आहे. रेडी गावात सुरू असलेल्या जुगाराच्या बैठकांविरुद्ध गावातील जागृत नागरिकांनी नाम. केसरकर यांचे लक्ष वेधले होते; परंतु केसरकर यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने राजकीय वरदहस्ताखाली रेडी गावात आजही जुगाराच्या बैठका खुलेआम बसत असून त्याला स्थानिक खाकी वर्दीचा कृपा आशीर्वाद लाभत असल्याचे सूत्रांकडून समजते. आलिशान चार चाकी गाड्यांमधून गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधून अनेक मोठमोठे जुगारी रेडी गावात जुगार खेळण्यासाठी दाखल होत असून लाखोंची उलाढाल या जुगाराच्या माध्यमातून होत आहे. आणि त्यात स्थानिक खाकी वर्दीचा खिसा भरला जातो; त्यामुळे स्थानिक खाकी वर्दीचे कर्मचारी हे शासकीय कर्मचारी म्हणून नव्हे तर जुगारी लोकांचे नोकर म्हणून काम करताना दिसून येतात. आज सायंकाळी ७.०० वाजता सुरू झालेल्या या जुगाराच्या बैठकीत कोणीही फोटो वगैरे काढण्याचा प्रयत्न केला तर त्यावरही बैठक बसविणाऱ्या जुगार यांचा कडक पहारा आहे. त्यामुळे कडेकोट बंदोबस्तात जुगाराच्या मैफिली सजत असल्याचे दिसून येत आहे.
नाम.केसरकर हे राज्याचे शिक्षण मंत्री असताना त्यांच्याच मतदारसंघात तरुणांना शिक्षणाचे धडे देण्याऐवजी काही नतदृष्ट राजकीय पुढार्यांकडून जुगाराचे धडे दिले जात असल्याचे आढळून येते. त्यामुळे अत्यंत शिस्तप्रिय मानल्या जाणाऱ्या नाम.दीपक केसरकर यांच्याच मतदारसंघात राजकीय वरदहस्ता खाली सुरू असलेल्या जुगाराच्या बैठका कधी बंद होणार..? असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत. दीपक केसरकर यांचे लक्ष वेधूनही जुगाराच्या बैठकांवर कारवाई होत नसल्याने रेडी गावातील नागरिकांचा नाम.केसरकर यांच्यावरील विश्वास देखील कमी होत चालला असून भविष्यात दीपक केसरकर यांच्यासाठी रेडी गावातील निवडणुकीच्या परीक्षेचा पेपर कठीण जाण्याची शक्यता आहे. नाम.दीपक केसरकर जुगाराच्या बैठकांबाबत काय भूमिका घेतात…? व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात..? याकडे रेडी वासियांचे लक्ष लागले आहे.