सीरियल किलर रामन राघव याच्या मुसक्या आवळत त्याला अटक करणारे मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी अॅलेक्स फियालोह यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. त्यांचे वय ९२ वर्ष होते.
फियालोह हे वांद्रे येथे कटुंबियांसह वास्तव्यास होते. शुक्रवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. वांद्रे येथील अँड्रूस चर्चमध्ये शनिवारी फियालोह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फियालोह यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
१९६८ मध्ये डोंगरी पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक असताना दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरातून मुंबईला हादरवून सोडणाऱ्या रामन राघव या सीरियल किलरच्या मुसक्या आवळण्याचा पराक्रम केला होता. अॅलेक्स फियालोह यांना रामन राघवला अटक केल्याबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले होते. ते मुंबई पोलीस दलातून सहायक पोलीस आयुक्तपदावरुन सेवानिवृत्त झाले होते. फियालोह नामवंत हॉकी खेळाडू होते ते मुंबई पोलिसांच्या संघाकडून खेळत होते. फियालोह यांनी १९६२ मध्ये पोलीस दलातील नोकरी स्वीकारली होती.
१९६६ ते ६८ या दोन वर्षांच्या कालावधीत रामन राघव याने मुंबईत धुमाकूळ घातला होता. बेघर, रस्त्याकडेला झोपड्यांमध्ये झोपलेल्या सुमारे ४१ निष्पाप लोकांचे रामन राघव याने बळी घेतले. लोखंडी रॉड, दगड यांसारख्या वस्तूंचा वापर करून रामन राघव याने हत्यासत्र सुरू ठेवले होते. विशेष म्हणजे अनेक पथके तयार करण्यात आली तरी रामन राघव काही कुणाच्या हाताला लागत नव्हता. तत्कालीन पोलीस आयुक्त इम्यॅन्युअल मोडक यांना खूनसत्राचा तातडीनं छडा लावायचा होता.
यासाठी पोलीस निरीक्षक विनायकराव वाकाटकर यांच्या नेतृत्वात एक पथक स्थापन कऱण्यात आले होते. अॅलेक्स फियालोह हे देखील त्या पथकामध्ये काम करत होते. अॅलेक्स फियालोह हे त्यावेळी त्यांच्यासोबत नेहमी रामन राघवचा फोटो सोबत ठेवत होते. रामन राघव सोबत त्यावेळी भिजलेली छत्री होती. मुंबईत पाऊस नसतानाही भिजलेली छत्री पाहून अॅलेक्स फियालोह यांना संशय आला. यानंतर त्यानी रामन राघवला अटक केली. न्यायालयानं रामन राघवला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. १९९५ मध्ये रमन राघवचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. उपनिरीक्षक असताना फियालोह यांनी रामन राघव याला शोधून काढल्याने ते चर्चेत आले.