You are currently viewing पाॅपकाॅर्न

पाॅपकाॅर्न

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*पाॅपकाॅर्न*

 

पॉपकॉर्न या शब्दाशी तशी आयुष्यात जरा उशीरच ओळख झाली. पण पाहता क्षणीच मी त्या शब्दाच्या आणि चवीच्याही प्रेमात पडले. “ती पाहताच बाला कलीजा खलास झाला” अशीच काहीतरी अवस्था मनाची झाली. “अगदी सुंदरा मनामध्ये भरली”.

इतक्या दिवसांच्या जीवन प्रवासात वेगवेगळ्या चवींचे अनुभव काय थोडे असतात का? आता बघा पॉपकॉर्न मधला पॉप थोडावेळ बाजूला ठेवूया आणि उरलेल्या त्या काॅर्नशी आपला संबंध होताच की? काॅर्न हा शब्द असेल परदेशी थाटाचा, काहीसा नखरेल, आधुनिक संस्कृतीशी चटकन शेक हँड करणारा पण आपल्यासाठी त्याचा एकच अर्थ मका. आणि मका म्हटलं की एकावर एक मस्त मखमली धाग्यांचं, मऊ वस्त्र लपेटलेलं एक सुंदर दाणेदार कणीस! दाणे कधी पांढरे कधी पिवळसर पण रूप अतिशय देखणं, आणि या मक्याचे आणि पावसाचे एक घट्ट नाते आहे. छान पावसाच्या सरी कोसळत असाव्यात, वातावरणात ओला गारवा, असावा कुठेतरी झाडाच्या खाली अथवा रस्त्याच्या कडेला पावसापासून सुरक्षित निवारा शोधून मक्याच्या कणसांची रास गाडीवर ठेवून, कोळशाची शेगडी पेटवून , त्या तप्त निखाऱ्यांवर कणसे भाजणारा “तो” किंवा “ती” दिसावी आणि तिथे टुणकन् उडी मारून आपण जावं. त्या उडणार्‍या ठिणग्या आणि तडतडणारे दाणे आणि नंतर त्या शेगडीवर भाजलेल्या, वरून तिखट, मीठ, लिंबू पिळलेल्या खमंग, गरम कणसांचा आस्वाद घ्यावा. ते खरपूस, रसदार दाणे चावून खाताना रसनेची होणारी तृप्ती…क्या बात है!.. अलौकिकच! ज्या कोणी याचा आनंद घेतला नसेल तर तो जीवनातल्या महान आनंदला कायमचा मुकला आहे असेच मी म्हणेन.

तर अशा या मक्याशी— काॅर्नशी असलेलं, आपलं नातं तसं जुनच. पिढ्यानु पिढ्या चालत आलेलं. पण या मक्याचे “पॉपकॉर्न” असं नामकरण झालं आणि आपण एका वेगळ्याच संस्कृतीत पाऊल टाकलं.जसं निवडुंगाचं कॅक्टस झालं,तसंच काहीसं.पण ही संस्कृती आहे. हलकीफुलकी, नाचणारी, बागडणारी, उडणारी पॉप संस्कृती. रेडीमेड पण चविष्ट, खमंग आणि सहज नेत्रांना सुखावणारी, रसनेलाही भावणारी. म्हणजे पॉपकॉर्न या उच्चाराबरोबर काॅर्न किंवा मका खाण्याचे वैज्ञानिक, आरोग्य विषयक नियमांचे विचार वगैरे येत नाहीत बरं का? म्हणजे त्याचे अँटिऑक्सिडंट घटक, हृदयाला ऊर्जा देणारी गुणवत्ता वगैरे असं काहीही गंभीर, अभ्यासात्मक मनाला त्यावेळी स्पर्शूनही जात नाही. ते सारं ज्ञान एकीकडे आणि कागदाच्या उभट द्रोणातून भरभरून वाहणारे वेगवेगळ्या फ्लेवरचे (चवीचे न म्हणता) पॉपकॉर्न खाण्याची मजा काही औरच.

पण क्षणभर थांबा. आता या खाद्याच्या मजेच्या, आनंदाच्याही पातळ्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे हे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. त्यातही पुन्हा ऑप्शन्स आहेत. “ए वन पॉपकॉर्न” या ब्रँडचे छोटे, कागदी पुडीतले, इन्स्टंट म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये दोन मिनिटात तडतड उडणारे पॉपकॉर्न खाऊ शकता किंवा चक्क सुकलेले मक्याचे दाणे किंचित तेलावर, शिट्टी न लावलेल्या कुकरमध्ये गरम केले की तुम्हाला या मक्याच्या सुंदर, नक्षीदार, हलक्या लाह्या घरबसल्या मिळतील. मग त्यावर तुमच्या आवडीचं, कुठलंही मसालेदार, चटकदार मिश्रण भुरभुरा. पॉपकॉर्न तयार. आता मात्र त्यास मक्याच्या लाह्या हे पारंपारिक विशेषनाम न देता काय म्हणाल?

“पॉपकॉर्न”

“. बरोब्बर”

मस्त . टीव्हीवरच्या अथवा ओटीटी वरच्या एखादा अत्यंत कंटाळवाण्या सिनेमाचीही रंगत हे पॉपकॉर्न वाढवतात. जोडीला बाहेर पाऊस पडत असेल तर मग अगदीच दुग्ध शर्करा योग. यातही भरपूर मजा आहे.

पण मंडळींनो! पॉपकॉर्न आणि मजा याची ही अगदीच मर्यादित, सामान्य पातळी आहे. अगदी उपहासाने, काहीसं तिरसटपणे, तुच्छतेने उच्चभ्रुंच्या ठेवणीतलं म्हटलेलं वाक्य म्हणजे “मिडल क्लास मेंटॅलिटी” “मध्यमवर्गीय मानसिकता” घरीच बनवा,घरीच खा हा ट्रेंड. कारण पॉपकॉर्नचं खरं नातं आहे ते आजच्या नवयुगातल्या मॉल संस्कृतीशी. पीव्हीआर, आयनॉक्स, सिने संस्कृतीशी. थिएटर मधल्या गोल्ड, प्लॅटिनम, रेक्लायनर या बैठक संस्कृतीशी. त्या मस्त थंड काळोखात घमघममणारा तो पॉपकॉर्नचा विशीष्ट, नमकीन सुगंध तुम्हाला कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात घेऊन जातो.

बाहेरच्या काउंटरवर काचेच्या मागे त्या आनंदाने टप टप उडणाऱ्या, गरमागरम लाह्या , (लाह्या नाही हो…पाॅपकाॅर्न) न खाता किंवा खिशात हात न घालता तुम्ही पुढे गेलात तर हाय कंबख्त! एक तर तुम्ही अत्यंत कंजूष किंवा “इतके पैसे कशाला मोजायचे?””दोन रुपयाच्या ठिकाणी दोनशे का द्यायचे?” या काटकसरी, कर्तव्यनिष्ठ, समंजस,धोरणी,संयमी वयस्कर समूहातले असाल. फार तर लार्ज कप नका घेऊ. थोडेसे तरी पैसे वाचवून स्मॉल कप घ्या, पण घ्या. त्याशिवाय पीव्हीआर मध्ये जाऊन सिनेमा पाहण्याच्या निखळ आनंदाची पूर्तता होणारच नाही.सिनेमा भिक्कार कां असेना पण पॉप काॅर्न हवेतच. वाटल्यास चित्रपटगृहात बालदीभरून पॉपकॉर्न खाणाऱ्यांबद्दल, “काय ही आजची युवापीढी, बापाच्या जीवावर मजा करते किंवा आयटीत जॉब असेल. लहान वयात भरपूर पैसा मग काय मजा.. किंवा आजकाल काय खिशात क्रेडिट कार्ड असतेच ना..” असे शेरे तुम्ही या खर्च करणाऱ्या, उधळपट्टी करणाऱ्या पिढीवर मनातल्या मनात मारू शकता. पण घरी आल्यावर हिशोबाच्या डायरीत सिनेमाची— मी आणि सौ— दोन तिकिटे..रु. साडेसातशे प्लस पॉपकॉर्न रु.साडेतीनशे अशी नोंद करताना मुळीच हळहळू नका.

या वयातही “थोडीसी रुमानी हो जाये” हाच अटीट्यूड ठेवा की! नाही तर भूतकाळात रमाल. आम्ही दोन रुपये देऊन पिटात पिक्चर पाह्यचो. फार तर मध्यंतरी पुडीतले चणे किंवा थोडे पैसे असतील तर मटका कुल्फी. काय कमी मजा होती का यात? अगदी गेला बाजार नाट्यप्रेमींचा आनंद काय होता? खरं म्हणजे आजही आहेच तो. मध्यंतरात मस्त जायफळ, वेलची घातलेली मधुर कॉफी आणि गरम बटाटेवडे. पण हे दृष्य गडकरी रंगायतन किंवा बालगंधर्व मध्ये. पीव्हीआर मध्ये नक्कीच नाही. तिथे मात्र हेच अहंकारी, शिष्ट, तडतड उडणारे तरीही तुम्हाला खुलवणारे, बोलवणारे, तुमच्या “पैसे बचाव” घट्ट संस्कृतीच्या रेषा ओलांडायला लावणारे, हलकेफुलके पॉपकॉर्नच.

तर मंडळी पॉपकॉर्न ही एक संस्कृती आहे. त्या पलीकडे जाऊन मी म्हणेन ती एक मानसिकता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मराठी भाषा विषयक अभिमानाला आणि मराठी माणसाने मराठीतच बोलावे या संदेशाला सादर प्रणाम करून आणि नंतर त्यांची मनस्वी क्षमा मागून विनम्रपणे मी म्हणेन की “पॉपकॉर्न” या धबधब्यासारख्या, एका विशिष्ट लय असलेल्या, उच्चारवातच आनंदाची कारंजी उडवणाऱ्या, हलक्या फुलक्या शब्दाशीही नाते आणि खाद्य संस्कृती जुळवण्याचा एक प्रयत्न तरी करून बघूया. बदलत्या काळाबरोबर जरा जगायला शिकूया की.

आनंददायी खवय्येगिरी .

जाता जाता आणखी एक. पॉप काॅर्न या शब्दातही एक संदेश दडलेला आहे. नाचा, उडा,मुक्त व्हा आणि मूळचा कडक, कठीण, सुका भाव उधळून पिसासारखे हलके व्हा.”

“मन उडू उडू झाले” याचा हा वेगळाच अर्थही जाणून घेऊया.

 

*राधिका भांडारकर*

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा