You are currently viewing लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज

लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज

लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नाव आदर्श राजा, बहुजन व दलित समाजाचे नेते, प्रजाहितदक्ष राजा अशा संबोधनांनी उल्लेखित केले जाते. लोकनेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. समाजसुधारणेच्या चळवळीमध्ये कोल्हापूरचे संस्थानिक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य अत्यंत प्रभावी राहिलेले आहे .त्यांचे संपूर्ण जीवनच समाजातील पददलित मागास अल्पसंख्याक, निराधार गरीब यांच्या कल्याणासाठी अर्पित आहे. सरकारी नोकरी मध्ये आरक्षणाचा कायदा केला. शिक्षणासोबत शेती, उद्योगधंदे, जंगलसंपत्ती, सहकार, व्यापार, सांस्कृतिक क्षेत्रात चित्रकला, नाट्यकला, गायन तसेच क्रीडा क्षेत्रात कुस्ती व इतर विविध क्षेत्रांचा विकास करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पैसा पुरविणे, मार्गदर्शन करणे, कलावंतांना प्रोत्साहन देणे असे अभूतपूर्व कार्य केलेले आहे. अशा या थोर लोकराजाच्या जीवनकार्याचा प्रभाव आजपर्यंत कायम आहे आणि उद्याही राहील. कारण त्यांनी समाजपरिवर्तनाचे फार मोठे कार्य केले आहे. त्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!!

कुस्ती, शिकार, घोड्यावर बसणे यांसारख्या कौशल्यांमध्ये त्यांची बरोबरी करणारा एकही राजकुमार तेथे नव्हता. त्याचठिकाणी त्यांचा मनमिळावू,निगर्वी व निर्भिड स्वभाव सर्वांच्या नजरेत भरला. इ.स.१८८५ ते १८८९पर्यंत महाराजांनी राजकोट येथील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १८९० ते १८९४ या काळात धारवाड येथे महाराजांचे शिक्षण झाले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी २ एप्रिल १८९४ रोजी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी समाजजीवनाचे बारकाईने निरीक्षण केले. त्या वेळी त्यांचे वय केवळ वीस वर्षांचे होते. राज्यातील जनतेसाठी विविध योजना आखून जनतेच्या कल्यानाचे कार्य सुरू केले. ‘प्रजेच्या सुखातच राजाचे सुख आहे’ यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी संगीत, वाद्य, शिकार, कुस्ती, अश्वारोहण, मल्लखांब यांसारख्या कलांना प्रोत्साहन दिले. त्यांमुळे कोल्हापूर हे ख अर्थाने कलापूर झालेले दिसते. शाहू महाराजांनी संस्थानातील गुणी कारागिरांना उत्तेजन दिले.

शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य

दिखाऊ कार्यापेक्षा चिरस्थायी व बहुसंख्य समाजाला फायदा करून देणाऱ्या कार्याला महाराज महत्त्व देत, हे जसे शिक्षणाच्या क्षेत्रात ही दिसून आले. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणप्रसाराला तर एका फार मोठ्या अभियानाचे स्वरूप दिले. पिढ्यान् पिढ्यांपासून शिक्षणाला मुकल्यामुळे या देशातील बहुसंख्य लोक दैववादाच्या दाढेत आणि दारिद्र्याच्या दरीत सापडले आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी मागासलेल्या सर्व जातीतील विद्यार्थांच्या शिक्षणात जातीने लक्ष घातले. सर्वांगीण विकासाचे साधन म्हणजे शिक्षणप्रसार हे महाराजांनी ओळखले होते; म्हणूनच त्यांनी संस्थानात सर्वांना शिक्षण सक्तीचे करण्याचा कायदाच केला. शिक्षण शिकणाऱ्या मागास वर्गासाठी शिष्यवृत्त्या चालू केल्या. शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृहे सुरू केली.निरनिराळ्या जातींतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कोल्हापूर शहरात वसतिगृहे बांधून दिली. संस्थानाबाहेरील शिक्षण संस्थांनाही त्यांनी मोठमोठ्या देणग्या दिल्या. वसतिगृहाची चळवळ संस्थानाबाहेरही गेली. त्यांना अभिप्रेत असलेल्या समाजपरिवर्तनाचे साधन म्हणजे शिक्षणप्रसार, शिक्षणप्रसारामुळे सामान्यजनांच्या जीवनात अस्मिता निर्माण झाली. १९१२ मध्ये कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा त्यांनी हुकूम सोडला. या कायद्याची अंमलबजावणीदेखील त्यांनी तितक्याच आस्थेने केली. त्यांनी पुण्याला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामी मराठा सरदारांच्या व प्रमुख व्यक्तींच्या बरोबरीने पुढाकार घेतला; पण पुतळयाच्या बरोबरच श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल स्थापन करुन या स्मारकाला उपयुक्त व कायम स्वरूप दिले.सर्वजातींचा, सर्वधर्मीयांचा उत्कर्ष साधावयाचा तर त्यांना शिक्षण दिले पाहिजे हा महाराजांचा आग्रह होता. शिक्षण ही समतेची चावी, उद्योगाची जननी राज्यकत्यांचे खरे कर्तव्य शिक्षण व उद्योग यांची वाढ करणे, कारभार नीट दक्षतेने निष्ठेने होऊ लागले. महाराजांच्या या प्रयत्नांमुळेच कोल्हापूर संस्थानामध्ये स्त्रीशिक्षणाच्या शाळांच्या आणि विद्यार्थिनींच्या संख्येत खूपच वाढ झालेली दिसून येते.

शिक्षण देण्यासाठी इ.स. १९१२ मध्ये “पाटील शाळा काढली. त्याशिवाय ‘शिवाजी क्षत्रिय वैदिक स्कूल” “सरदार स्कूल”, संस्कृतच्या अध्ययनासाठी पाठशाळा, उर्दू आणि अरेबिक भाषांच्या अध्ययनासाठी उर्दू आणि अरेबिक शाळा काढल्या. एवढेच नव्हे तर दोंगरी जमातीच्या लोकांसाठीसुद्धा शाळा काढली.विविध जातीजमातीतील विद्यार्थ्यासाठी विनामूल्य वसतिगृह आणि भोजनगृहांची शाहू महाराजांनी स्थापना केली. हे त्यांचे शिक्षणक्षेत्रातील आणखी एक अमूल्य असे कार्य आहे. महाराजांनी एके ठिकाणी असे उद्गार काढले आहेत, की इंग्लंड ही संसदीय शासनप्रणालीची जननी असेल, तर कोल्हापूर ही विद्यार्थ्यांसाठी मुक्त वसतिगृहे आणि भोजनगृहे यांची जननी आहे. छत्रपती शाहू महाराजांनी संस्थानातील गावागावातून प्राथमिक शाळा काढल्या.

व्यावसायिक शिक्षणाकडेही महाराजांनी लक्ष दिले. खेडेगावचा कारभार व्यवस्थित चालविता यावा यासाठी त्यांनी पाटील व तलाठी शाळा चालू केल्या. शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र चालू केले. तांत्रिक शिक्षणासाठी जयसिंगराव घाटगे तांत्रिक संस्था स्थापन केली. या संस्थेत लोहारकाम, गवंडीकाम, सुतारकाम यासारख्या विषयांचे शिक्षण दिले जाई.

शाहू महाराजांचे कृषि क्षेत्रातील योगदान

कोल्हापुरात सहकारी चळवळीचा आणि शेतकऱ्यांच्या संघटनेचा उपक्रम फार पूर्वी सुरू झाला आणि त्याची प्रेरणा शाहू महाराजांची होती. या सहकारी चळवळीने शेतकऱ्यांना संरक्षण मिळाले. शेतकरी संघ स्थापन करण्यास प्रेरणा देऊन, दलालांकडून होणारी पिळवणूक थांबविण्यास महाराजांनी हातभार लावला. महाराजांना शेतीमध्ये विशेष रस होता हे त्यांच्या कारकिर्दीच्या आरंभापासून दिसून येते. शेती करण्यात कमीपणा आहे अशी जर लोकांमध्ये भावना असेल तर तिथे उच्चाटन झाले पाहिजे असे त्यांचे मत होते, आपल्या युवराजांना त्यांनी शेतीविषयक विशेष शिक्षण घेण्यास उयुक्त केले होते. परकीय दीप्यात महाराज तेथील शेतकी तंत्राची कसोशीने माहिती घेत शेती संशोधनाच्या सिद्धांतापेक्षा व्यावहारिक बाजूबद्दल त्यांना विशेष आस्था होती. त्या वेळी ८० टक्क्यापेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून होते. पारंपरिक शेती करण्यामागची लोकांची अडचण महाराजांनी ओळखली होती. हे अडथळे मुख्य चार प्रकारचे होते; १) शेतकयांचे अज्ञान व निरक्षरता २) भांडवलाची कमतरता ३) शेतीचे बिनकिफायतशीर आकारमान ४) विक्रीबाबत संघटनेचा अभाव. यापैकी शेतकऱ्याचे अज्ञान दूर करण्यासाठी त्यांना सामान्य शिक्षण देऊन चालणार नाही तर शेतीविषयक व्यावसायिक शिक्षण दिले पाहिजे असे त्यांचे मत होते. असे शिक्षण परत स्थानिक पातळीवर खेडेगावातच मिळाले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. भांडवलाची कमतरता दूर करण्यासाठी त्यांनी संस्थानामार्फत वेगवेगळे निधी स्थापून कर्जाची व मदतीची व्यवस्था केली होती. तसेच उत्पादित माल विकण्यासाठी ब्रिटिशांच्या धर्तीवर सहकारी पतपेढ्या स्थापन करण्यास उत्तेजन दिले. सुधारित अवजारांसाठी एक म्युझियम उघडण्यात आले. त्यातील अवजारे शेतकऱ्यांना प्रयोगासाठी मिळत. त्या काळात शेतमाल विक्रीसाठी कोणतीच संघटना नव्हती. ही अडचण ओळखून महाराजांनी लोकांना पतपेढ्या स्थापन करण्यास उत्तेजन दिले.

पश्चिमेतील राष्ट्रांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरून जी प्रगती केली ती इतरांना प्रेरणा देणारी होती. शाहू महाराजांनी अशाच प्रकारे आपल्या संस्थानाचा विकास घडवून आणण्याचा निर्धार केला. १९०८ मध्ये त्यांनी भोगावती नदीवर राधानगरी हे धरण बांधले. राधानगरी धरण ही महाराजांची कोल्हापूरला दिलेली अनमोल देणगी आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या विविध योजना राबवल्या. या धरणाने कोल्हापूर संस्थानात हरितक्रांतीची नांदी घातली. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून शाहूपुरी या बाजारपेठेची त्यांनी स्थापना केली. जयसिंगपूर नावाचे एक नवीन शहर बसवून व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन दिले. संस्थानाबाहेरच्या व्यापाऱ्यांना येथे व्यापार करण्यास प्रोत्साहन दिले. संस्थानाच्या बाहेरही आपल्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून मिरज ते कोल्हापूर हा रेल्वेमार्ग तयार केला. शेतकरी आणि मजूरवर्गाला त्यांनी सतत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी नवीन पद्धतीचा अवलंब करावा अशी त्यांची इच्छा होती. शेतीला औद्योगिक रूप देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याच्या उद्दिष्टाने त्यांनी सहकारी चळवळीला चालना दिली.

शाहू महाराजांचे सामाजिक कार्य

शिक्षणप्रसाराबरोबरच राजर्षींनी अस्पृश्यता आणि जातिभेद निर्मूलनावरच भर दिला होता. त्यासाठी समाज-प्रबोधनाची व्याप्ती त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर वाढवली. समाज-सुधारणेच्या कार्याला वाहून घेतलेल्या संस्थांना, संघटनांना आणि व्यक्तींना राजर्षीनी सक्रिय साह्य केले आणि भरीव पाठिंबा दिला. सत्यशोधक समाज, आर्य समाज आणि थिऑसॉफिकल सोसायटी यांसारख्या संस्थांच्या कार्याला त्यांनी कोल्हापूर संस्थानात खूप प्रोत्साहन दिले. अस्पृश्यता घालविण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी क्रांतिकारी पाऊल उचलले. दलितांना सामाजिक न्याय आणि अधिकार देण्यासाठी त्यांनी कायदे पास केले. आपल्या संस्थानातील वेठबिगारी त्यांनी बंद केली. १९१८ मध्ये त्यांनी महाराजांची बलुते पद्धती बंद केली. ही पद्धती दलितांच्या लाचारीचे आणि परावलंबनाचे कारण होते. अस्पृश्यावर आणि परंपरेने गुन्हेगार ठरवलेल्या जातीतील लोकांवर अन्याय करणाऱ्या लोकांना त्यांनी कडक शासन केले.

आपण कोण? आपल्या जीवनाचा अर्थ काय? माणसाचे ध्येय काय असावे ? हेच प्रश्न मनुष्याने स्वत:ला विचारावेत असे राजर्षी शाहू महाराजांचे मत होते. तीच गोष्ट ते सामान्यांच्या मनावर बिंबंबीत, त्या सामान्यांतूनच त्यांनी असामान्य लोकोत्तर माणसे निर्माण केली. छत्रपती शाहू महाराजांनी पसरविलेला विचार हा मूलगामी, मानवी मनामधील मानवी हक्कासाठी आणि मानवी समानतेसाठी जागृती व्हावी, त्यासाठी असंतोष निर्माण व्हावा म्हणून त्यांनी केलेले कार्य अमोल आहे.

शाहू महाराजांचे उद्योग क्षेत्रातील कार्य

कोणत्याही समाजाचा आर्थिक उत्कर्ष आणि विकास हा समाजातील कुशल आणि प्रशिक्षित कामगारांवर अवलंबून असतो याची महाराजांना पुरेपूर जाणीव होती; त्याचप्रमाणे आपल्या संस्थानातील लोकांनी केवळ शेतीवर आणि लष्करी सेवेवर अवलंबून राहू नये तर व्यापार आणि उद्योग क्षेत्रातही पुढे यावे अशी त्यांची इच्छा होती. एवढ्यासाठी गादीवर बसल्या बसल्या महाराजांनी कोल्हापूर संस्थानचे औद्योगिक सर्वेक्षण करण्याचा हुकूम दिला. महाराजांनी जयसिंगराव घाटगे तंत्रशाळेची स्थापना केली. त्यामध्ये विविध प्रकारचे कारागिरीचे तंत्रशिक्षण दिले जाई.शिक्षण प्रसाराबरोबरच उद्योगधंद्यांची वाढ करण्यासाठी अपार प्रयत्न केले. १८९५ मध्ये महाराजांनी‘शाहूपुरी’ या बाजारपेठेची स्थापना केली. तसेच ‘शाहू छत्रपती स्पिनिंग आणि विव्हिंग मिल’ स्थापन केली. पुण्याच्या स्वदेशी कागद गिरणीला साह्य केले. रंगाचा कारखाना काढण्यासाठी योजना केली.

उद्योग विकासाकरिता शाहूपुरी या स्वतंत्र नगरीची स्थापना केली. संस्थानातील गुळाचा व्यापार लक्षावधी रुपयांनी वाढला. व्यापारी जगात पत आणि प्रतिष्ठा वाढली. अनेक नवनवे उद्योजक पुढे आले. महाराजांनी त्यांना जागा दिली. कोल्हापूर संस्थानचे स्वरूपच बदलले. माणसात एक प्रकारचा नवा उत्साह, नवा आत्मविश्वास वाढला. सहकारी चळवळ आणि उद्योगजगतात विकास १९१२ मध्ये महाराजांनी सहकारी कायदा मंजूर केला. बलभीम को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही त्यांचीच निर्मिती; हरितक्रांतीबरोबरच सहकारक्रांतीही त्यांनी सुरू केली. आज कोल्हापुरातील सहकारी चळवळ महाराष्ट्रात नावलौकिकास चढलेली आहे, ती छत्रपतींच्या प्रेरणेनेच सहकारी उद्योग, सहकारी सेवा संस्था, पतसंस्था उभ्या करून शेतकयांच्या ठायी त्यांनी नवीन प्रेरणा निर्माण केल्या. नवी पिके लावणे, सहकारी कारखाने काढणे हे छत्रपतींचे धोरण हरितक्रांतीचा पाया ठरले.

१९१७ मध्ये विधवांकरिता पुनर्विवाहाचा कायदा व १९१८ मध्ये आंतरजातीय विवाह कायदा कोल्हापूर संस्थानात महाराजांनी मंजूर केला. महाराजांनी अनेक विवाह घडवून आणले. त्यामुळे जातिभेदाची तीव्रता कमी झाली. खियांच्या व्यक्तिमत्त्वविकासास चालना मिळाली.

भारतासारख्या देशाला औद्यागिक विकासाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून महाराजांनी शेती व उद्योग अशा दुहेरी व समतोल विकासाची जडणघडण केली. ‘औद्योगिक विकासामुळे साधन संपत्तीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न व व्यापार वाढविला जातो. त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागात कारखाने निघाल्यास स्थानिक पातळीवर लोकांना रोजगार मिळून त्यांना मोठ्या शहराकडे वळण्याची गरज राहत नाही. असे विचार त्यांनी राजाराम इंडस्ट्रीअल स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी काढले होते.

अशा तऱ्हेने उद्योग व व्यापार याबाबत संयुक्तरीत्या प्रयत्न केल्याने त्यांची परस्परपूरक वाढ झाली आणि संस्थानाचा उत्कर्ष पडून आला. व्यापार वाटल्याने व उद्योगाला चालना मिळाली. वाहतूक व्यवसाय सुधारला सर्वात महत्त्वाचे म्हण लोकांचे उत्पन्न बाडून त्यांची ऐहिक स्थिती बळकट होण्यास या सर्व सरंचनेचा मोठ हातभार लागला.

छत्रपती शिवाजी महाराज हे प्रथम लोकनेते म्हणून पुढे आले, नंतर ते छत्रपती म्हणून भारताच्या इतिहासात अजरामर झाले. शाहू महाराज हे प्रथम छत्रपती म्हणून लोकांसमोर आले आणि मागाहून लोकनेते म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झाले. सामान्य जनतेच्या जीवनाशी, त्यांनी स्वतःच्या उद्धारासाठी चालविलेल्या झगड्याशी समरस होऊन त्यांच्यामध्ये वावरणारा असा राजा त्यांच्या वेळच्या संस्थानिकात त्यांच्यासारखा दुसरा कोणी झालाच नाही. इतिहासाला देण देण्याचे सामर्थ्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येते. सामान्य जनतेची दु:खे, भावना ओळखून त्यांच्या दुःखाचे निवारण करण्याचे काम आपल्या आयुष्यभर सर्वस्वपणास लावून केले समाजातील उच्चनीचता, जातिभेद यांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला. अस्पृश्यता निवारण, मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण, विद्यार्थी वसतिगृहांची अभूतपूर्व योजना असे अपूर्व कार्य त्यांनी केले.

सत्तेचा उपयोग लोकोद्धारासाठी करावयाचा असतो हे तत्त्व कृतीत आणून दाखविणारे आदर्श राजपुरुष ठरले. थोर समाजसुधारकांची देणगी लाभलेल्या महाराष्ट्राला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारखे समाजसुधारक लाभले हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणावं लागेल. त्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!! (संदर्भ: राजर्षी छत्रपती शाहू महाराज -संपादक डॉ.अशोक नाईकवाडे)

संकलन: प्रा.डॉ.सुशिल सातपुते

सहाय्यक प्राध्यापक,कृषि विद्या विभाग, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कृषि महाविद्यालय ,कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर (९४०५७३३११२)

प्रतिक्रिया व्यक्त करा