दिवाळी म्हणजे रोषणाई, दीपोत्सव. संस्कृतमध्ये याला दीपावली म्हणतात. *दीपावली म्हणजे दिव्यांची रांग.* हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व आहे. भारतात सगळीकडे आपापल्या चालीरीतीप्रमाणे हा सण साजरा केला जातो. दिवाळीत अगदी गरीब श्रीमंत सर्वांच्याच घरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते. दिव्यांची आरास, आकाशकंदील, घरांवर रोषणाई, आणि दारात पेटवलेल्या पणत्या….
दिवाळीत पाच दिवस अत्यंत महत्वाचे मानले जातात. दिवाळीची तयारी म्हणजे फराळ, मिठाई, घराची साफसफाई, रंगरंगोटी, कपड्यांची खरेदी इत्यादी लोक आठ दिवस आधीच करतात. दाराला झेंडूचे तोरण, दारासमोर आकाशकंदील, आणि दारात सुंदर आकर्षक रांगोळी काढली जाते. तेलाचे दिवे, मेणबत्त्या, पणत्या इत्यादी लावून घरासमोर रोषणाई केली जाते, दिव्यांची आरास दिवाळीचे खास आकर्षण असते.
धनत्रयोदशी दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होते. दिव्यांची आरास करून घर सजवतात, कारण याच दिवशी धनाची देवी धन्वंतरी ची पूजा करतात, लक्ष्मी देवी सुद्धा याच दिवशी घरात प्रवेश करते.
नरकचतुर्दशी नरकासुराचे प्रतीक म्हणून कोकणात पहाटे आंघोळ करून तुळशी वृंदावनासमोर कारट फोडून “गोविंदा गोविंदा” अशी आरोळी देऊन कारटाची बी डोक्याला लावून जिभेवर कारटाचा रस लावून कडू चव चाखली जाते. आप्त इष्ट सर्व मिळून पोहे, चकली, लाडू, अनारसे इत्यादी फराळावर यथेच्छ ताव मारतात.
लक्ष्मीपूजन दिवाळीचा तिसरा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. दिव्यांची सजावट आणि रांगोळी काढून लक्ष्मी मातेची पूजा केली जाते व आपल्या घरात कायम वास करण्याचे आवाहन केले जाते. देवीदेवतांच्या आगमनासाठी फटाके फोडून जल्लोष केला जातो. व्यावसायिक, दुकानदार आपापल्या दुकानात कुबेर आणि लक्ष्मी मातेची पूजा करतात.
पाडवा दिवाळीचा चौथा दिवस. पती-पत्नी एकमेकांस उपहार देऊन खुश करतात. पतीला औंक्षण करतात. बऱ्याच ठिकाणी गोवर्धन पूजा देखील केली जाते. गाई-बैल यांना सजवून निष्ठांन खायला घालतात.
भाऊबीज भावा बहिणीच्या प्रेमाच्या अतूट नात्याला जपण्याचा दिवस. यादिवशी बहिणी आपल्या लाडक्या भावाला दिव्यांची आरास करून ओवाळून त्याच्या सुखी, समृद्ध जीवनासाठी प्रार्थना करतात. भाऊ बहिणीला छान भेट देत आपले नाते आणखी मधुर बनविण्यासाठी प्रयत्न करतात.
भगवान श्रीराम रावणाचा वध करून सीता मातेला घेऊन अयोध्येत परतले तो दिवस म्हणजे दिवाळी. त्यादिवशी अयोध्येपासून मिथिला पर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांची रोषणाई करून प्रकाशमान झाला होता. कोकणात मात्र दिवाळी वैशिष्ट्य पूर्ण साजरी केली जाते. पहाटे उठून अंगास उटणे लावून आंघोळ करून तुळशीसमोर कारट फोडून नरकासुर वध केला जातो. त्यानंतर गूळ घातलेले गोड पोहे, तिखट पोहे, लाडू चकली, अनारसे, शंकरपाळी, करंजी,उकडलेली रताळी, उसळ,चहा असा फराळ केला जातो. मित्रमंडळी, सगेसोयरे सर्व एकत्र येतात. फराळाची आदानप्रदान होते, संध्याकाळी दिव्यांची आरास, आकाशकंदील प्रकाशमान केले जातात, आणि दिवाळीचा यथेच्छ आनंद लुटतात.