कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या दूर न केल्यास 30 जूनला उपोषण..
कणकवली
कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राची दैनावस्था आणि समस्यांमध्ये वारंवार वाढ होत चालली आहे. अनेक वेळा आंदोलने उपोषणे होऊन देखील कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दैनावस्था व वाढत्या समस्यांचा आलेख मात्र चढत्या क्रमांकाला असलेला पाहायला मिळतो. तब्बल ५० हुन अधिक दिवस आरोग्य केंद्रातील रुग्ण पाण्याविना होते. आपली जबाबदारी म्हणून कोणत्याही अधिकाऱ्यांनी पाहिले नाही. त्यामुळे आरोग्य केंद्राची दैनावस्था व समस्या वाढत गेले. कळसुलीसह बोर्डवे, ओसरगाव, वागदे, कसवण – तळवडे, हळवल, शिरवल, शिवडाव सह आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांच्यावतीने कणकवली प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच समस्या दूर करा अन्यथा ३० जून २०२३ रोजी ग्रामस्थांच्यावतीने उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, कणकवली, तहसीलदार आर. जे. पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पोलीस ठाणे कणकवली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना रुजाय फर्नांडिस, रजनीकांत सावंत, विराज गोसावी, कृष्णा चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बबली राणे, माजी सरपंच अर्जुन देसाई, संतोष दळवी, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात बि. ए. एम. एस डॉक्टर नको असून एम. बी. बी. एस डॉक्टर नियुक्त करा, औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आदि रिक्त पदे तातडीने भरा, ४० दिवस झाले तरी होणाऱ्या पाणी टंचाईवर तोडगा काढा. प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर स्वच्छता करा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी दूर राहत असल्याने अतिगंभीर रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत, कर्मचारी कायमस्वरूपी थांबत नाहीत, आरोग्य केंद्रांची ईमारत जीर्ण झाली आहे, कर्मचारी रहतात त्या कॉटर्सची देखभाल होत नाही, ड्युटीला असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ड्यूटी लिस्टचा फलक लावा, कॉटर्स लगत असलेली झाडी धोकादायक असून तातडीने तोडा, गरोदर महिलांना गरम पाणी द्यावे, बंद असलेला इन्व्हर्टर सुरू करा. प्रा. आरोग्य केंद्रात कुत्र्यांचा धुमाकुळ असतो त्याला वाली कोण? अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले.
गटविकास अधिकारी श्री अरुण चव्हाण पंचायत समिती कणकवली यांचही निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. यावेळी श्री. चव्हाण यांनी आपण प्रयत्न करून जेवढ्या शक्य तेवढ्या समस्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन दिले. रुग्णालयात जाणवणाऱ्या पाणी टंचाईवर बिघाड झालेली यंत्रे सुधारित होईपर्यंत पर्यायी पाण्याची व्यवस्था करण्याबाबत सूचना दिल्या.