पो.नि.फुलचंद मेंगडे यांच्या बदलीनंतर कोलगाव जुगार अड्ड्यावर लाखोंची उलाढाल
गोवा बनावटीची दारू आणि अंमली पदार्थांची लूट करत सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव निरुखेवाडी येथे कुणकेरी तिठ्यावर खुलेआम जुगाराची मैफिल रंगत आहे. काल रात्री रंगलेल्या जुगाराच्या मैफिलीत “पिकू” नामक व्यक्तीने दारूच्या नशेत राडा केला. दारूच्या बाटल्या फोडून जोरदार हाणामारी झाली. सावंतवाडी पोलीस आणि त्या ठिकाणच्या बीट अंमलदार यांनी मात्र त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.
कोलगाव निरुखे येथील हा जुगाराचा अड्डा “शेख” आडनाव असलेली एक व्यक्ती चालवत असून जुगाराच्या साथीला दारू आणि अंमली पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खात्रीलायक वृत्त आहे. सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची सावंतवाडीतून बदली झाल्यानंतर कोलगाव निरूखे येथील जुगार अड्ड्यावर लाखोंची उलाढाल दिवसाकाठी होत आहे आणि सावंतवाडी पोलीस मात्र मूग गिळून गप्प असल्याचे दिसते.
सावंतवाडीच्या आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेले जुगाराचे अड्डे पुढे पुढे अंमली पदार्थांच्या नशेचे अड्डे बनतील अशी भीती नागरिकांना सतावत असल्याने सावंतवाडी पोलीस तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याची गंभीर नोंद घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.