*श्रीधर नाईक एक ज्वलंत विचार… जो ना कधी संपला, ना कधी संपणार…!*
सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व तसेच ध्येयवादी, कर्तव्यनिष्ठ आणि तळमळीचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून कै. श्रीधरराव नाईक यांची ओळख होती. समाजकार्य करताना अनेक गरजू कुटुंबांना आर्थिक सहाय्य करणे, समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे, विविध शैक्षणिक आणि क्रीडा संस्थांना आर्थिक मदत करणे, लोकांच्या वैयक्तिक गरजा किंवा अडचणी सोडवणे, तरुणांना व्यवसायात हातभार लावणे, कुणाला नोकरी मिळवून देणे, कुणाला रक्तदान करून त्यांचे प्राण वाचविणे, अन्यायाच्या विरोधात कायम खंबीरपणे उभे राहणे आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे यासाठी दिवसाच नव्हे तर रात्री- बेरात्रीही धाव घेणे अशाप्रकारचे सेवाभावी व्यक्तिमत्त्व कै. श्रीधरराव नाईक यांच्या अंगातच भिनलेले होते.
अंगी असलेल्या नेतृत्व गुणांमुळेच शालेय जीवनापासूनच श्रीधरराव नाईक यांनी समाजमनावर आपली वेगळी छाप उमटविली होती. अभ्यासातही ते हुशार होते. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येही ते प्रिय होते. शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातहि त्यांनी आपला ठसा उमटविला होता. माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी व्यवसायात पदार्पण केले. आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नांतील काही वाटा समाजाच्या हितासाठी खर्ची करत एक युवा वर्गाची ताकद त्यांनी उभी केली. त्यांच्याकडे काम घेऊन जाणारा कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही जाती धर्माचा असो आपल्याकडून त्यांच्यासाठी होईल तेवढी मदत करण्याचे काम श्रीधरराव नाईक करत होते.
दरम्यानच्या कालावधीत ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. युवक काँग्रेसचे संघटन करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्या काळात युवक काँग्रेसचे तेवढे संघटन नव्हते. श्रीधरराव नाईक यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढून जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या झेंड्याखाली अनेक तरूणांना संघटित करून युवक काँग्रेसची एक मजबुत संघटना बांधली. श्रीधरराव नाईक यांनी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष, एसटी सल्लागार समितीचे सदस्य, क्रीडा संघटनांचे अध्यक्ष, जिल्हा रिक्षा युनियन अध्यक्ष, रोटरी क्लब अध्यक्ष, शांतता कमिटी सदस्य अशी अनेक पक्षीय व सामाजिक संघटनांची पदे भूषवून त्या- त्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे. जातीय किंवा सामाजिक तणावाच्या परिस्थितीत शांततेने वाटाघाटी करून लोकांतील कटुता दूर करण्याचे कार्य सुद्धा श्रीधरराव नाईक यांनी पार पाडले आहे.
जिल्ह्यात त्यांचा होत असलेला नावलौकिक, त्यांना जिल्हावासियांकडून मिळत असलेले प्रेम त्यांची हीच वाढती ताकद त्यांच्या घाताचे कारण ठरली. एवढ्या प्रचंड ताकदीचा सामर्थ्यवान तरुण भविष्यात आपल्यापुढे मोठे आव्हान उभे करणार याची जाणीव विरोधी शक्तींना फार पुर्वीच झाली होती. या दहशतवादी, जातीयवादी शक्तींविरुद्ध उघड आणि निर्भीडपणे आवाज फक्त श्रीधरराव नाईकांनीच उठविला होता. विरोधकांसमोर त्यांनी आव्हान निर्माण केले होते. मात्र त्यांचे आव्हान संपविण्याचे डावपेच आखण्यात आले.
शनिवार दि. 22 जून 1991 च्या दुपारी मुंबईच्या भाडोत्री गुंडांनी श्रीधरराव नाईक यांच्यावर तलवारी, चाँपर आणि गुप्तीने सपासप वार केले. क्रुर काळाने सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या व्यक्तिमत्वावर झडप घातली.श्रीधरराव नाईक यांच्या जाण्याने जनसामान्यांचा कैवारी हरपला आणि सोबत पत्नी, दोन मुले आणि हजारो कार्यकर्ते पोरके झाले. 32 वार अंगावर घेतले परंतु आपल्या तोंडातुन शिवी बाहेर पडु दिली नाही. रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत मरणाच्या दारात उभा असताना श्रीधर नाईक यांच्या तोंडुन अखेरचे शब्द बाहेर पडले ते म्हणजे “ह्या बरा न्हय हा… ह्या बरा न्हय…!”
राजकीय दहशतवादाच्या विरोधात लढा देताना निर्माण झालेली राजकीय कटूता आणि वैमनस्यातून श्रीधरराव नाईक यांची हत्या झाली. श्रीधरराव नाईक यांचे चाहते आणि सहकारी कार्यकर्ते नंतरच्या काळात खंबीरपणे नव्या जिद्दीने उभे राहिले आणि एका नव्या राजकीय संघर्षाचा उदय झाला. त्यांच्या हत्येनंतर श्रीधरराव नाईक यांचे जेष्ठ बंधू विजयभाऊ काही काळ राजकीय संघर्षात उतरले होते. दरम्यानच्या कालावधीत राजकारणात बरीच समीकरणे बदलली एवढेच नव्हे तर सामाजिक, राजकीय क्षेत्रातील एक पिढी मागे पडून दुसरी पिढी सक्रिय झाली आहे. श्रीधरराव नाईक यांचे जेष्ठ चिरंजीव सुशांत नाईक हे नगरसेवक व युवासेना जिल्हाप्रमुख तर पुतणे वैभव नाईक हे आमदार म्हणून श्रीधरराव नाईक यांचा वारसा पुढे जोपासत आहेत.
अपप्रवृत्तीच्या लोकांनी श्रीधरराव नाईक यांची हत्या केल्याने परोपकारी वृत्तीचा व्यक्ती आपल्यातून निघून गेला. त्यांची हत्या जरी केली असली तरी त्यांचे विचार मात्र अजूनही जिवंत आहेत.समाजासाठी त्यांनी केलेले काम विचारात घेऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल…!
स्व. श्रीधरराव नाईक यांच्या 32 व्या स्मृतीदिनी त्यांना भावपूर्ण आदरांजली..!