*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या लेखिका कवयित्री सौ.योगिनी देशपांडे- पैठणकर लिखित पितृदिन विशेष लेख*
*”पत्रास कारण की…..*”
*”माझा अभिमान*”.
लेखन. सौ योगिनी देशपांडे – पैठणकर. ( भाभानगर,नाशिक)
परवा *”Father’s day*”. साजरा झाला . सर्व सोशल माध्यमातून बाप, बाबा, वडील , father किती मोठा, सहनशील, त्यागी, कष्टाळू वगैरे दाखवले गेले. नाही, ते असतातच तसे. खूप कविता असंख्य मेसेज आले पण वडिलांचा का असा एकच दिवस असतो? तो तर रोजचा असतो ! ते आहेत म्हणून आपण सर्व आहोत आणि आज या दिवसात आनंदी आहोत, हो ना?
माझे बाबा अनिल हरी देशपांडे….. व य फक्त आकडा 78, पण आम्हाला लाजवेल असा अजूनही उत्साह ,चैतन्य, कोणतही काम असो, वाचन असो, चांगल्या मैफीलीला स्वखर्चाने जाणं असो, इतरांना प्रोत्साहन ,घरातली मदत, लहानात लहान होण्याची कला, सतत चौफेर ज्ञान मिळवणे, चौकस बुद्धी आणि ते आम्हालाही मिळेल याची( अति) काळजी घेणं ,प्रवास, छंद, मित्रमंडळी, भेटीगाठी ,लोकांचे वाढदिवस , केलेले लेखन, एक ना दोन!
आईच्या आजारपणात आणि निधना नंतर खचून न जाता, नवीन उमेदीने जगणारे आणि उत्साही असलेले माझे बाबा आमचे आदर्श आहेत मुलीला तिचे वडील एक रोल मॉडेल व जवळचे मित्र असतात, खरंतर मी घाबरते त्यांना! पण तेवढं प्रेम आहे !रोज एक तरी फोन असतोच !हा ल हवाल ,सगळा ईती वृत्तांत तेथे सांगितला जातो, सल्ला मसलत होते ,वादही होतात, पण त्यात असते ती काळजीच!
बाबांनी तेहतीस वर्षे ऑडनस फॅक्टरी वरणगावला काढल्यानंतर आज ते पुणे( कोथरूड) येथे स्थायिक झालेत. संपूर्ण वेळ ते आपल्या छंदात रमतात, जास्त देव देव करण आवडत नाही, पण त्यांचा निसर्गावर, माणसांवर, ज्ञानावर प्रचंड विश्वास आहे आणि सकारात्मकता ही; मधे थोडं लागल्यानंतर जरा ते हल्ली फिरायला घाबरतात, अन्यथा सगळे देश ,तिथली माणसं संस्कृती ,बघण्याची त्यांना प्रचंड आवड !त्यांचा काव्यांकूर कवितासंग्रह आणि अंतर्नाद हा लघुसंग्रह प्रकाशित झालेला आहे. आम्ही त्यांच्या पुढील लेखनाची वाट पाहत आहोत आणि या निमित्ताने त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व फादर्स डे साठी खूप शुभेच्छा देतो.
योगिनी देशपांडे..पैठणकर. नाशिक