*अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणाऱ्या शिक्षण मंत्र्यांना म्हणावे तरी काय..?*
*माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांचा सवाल*
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा अलीकडेच पार पडला. यावेळी सावंतवाडी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावंतवाडी शहरात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री नाम.दीपक केसरकर यांनी “सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारूच्या किमती कमी करा” अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. नाम. दीपक केसरकर यांच्या मागणीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि दीपक केसरकर यांचेच एकवेळचे खंदे समर्थक असलेले माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांनी नाम.दीपक केसरकर यांच्या मागणीवर टीका करताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर सावंतवाडी येथे “दारूच्या किमती कमी करा” अशी मागणी करणाऱ्या शिक्षण मंत्र्यांना म्हणावे तरी काय…? अशा शिक्षण मंत्र्यांचा आदर्श मुलांनी तरी काय घ्यावा..? असे प्रश्न उपस्थित केले.
समस्त मध्यमवर्गीय जनता वाढलेल्या महागाईने होरपळत आहे, गॅस सिलेंडरच्या किमती चौपट वाढलेल्या आहेत, रोजचे घर चालविणे देखील सर्वसामान्य लोकांना मुश्किल होऊन बसले आहे. अशावेळी महागाईने होरपळलेल्या माता-भगिनींचे अश्रू पुसावे असे मात्र शिक्षण मंत्र्यांना वाटत नाही. आजचा त्याचा लाईट आणि बिल खर्च, मुलांचे शाळांचे खर्च यामुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करण्यासाठी नाम.केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असती तर नक्कीच त्यांचे जनतेने स्वागत केले असते. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारूच्या किमती कमी करण्याचे धोरण ठरवा ही मागणीनाम. दीपक केसरकर करताना त्या सभेत बसलेल्या महिला भगिनींनी नक्की काय समजावं..? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पत्रकार आणि संस्था जिल्ह्यात होणाऱ्या अवैद्य दारू वाहतूक, विक्री त्याचप्रमाणे अमली पदार्थांच्या विरोधात आवाज उठवत असतात तर दुसरीकडे महाराष्ट्राचे शिक्षण आणि भाषामंत्री दारूच्या किमती कमी करण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील आपले वजन खर्च घालत आहेत, यापेक्षा शरमेची बाब ती कोणती..? असा खडा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित करत दारूच्या किमती कमी करण्यासाठी वजन खर्च घालणारे राज्याचे शिक्षण तथा भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा आपण निषेध करत असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षाने याच्या विरोधात आवाज उठविणे आवश्यक होते, गावागावात चौकात चौकात निषेध करायला हवा होता परंतु विरोधी पक्ष यात कमी पडल्याचे दिसून आले. असेही बबन साळगावकर पुढे म्हणाले.
सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा..पर्यटनाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास व्हावा असे स्वप्न उराशी बाळगत महाराष्ट्राच्या राजकारणात झेप घेणारे सावंतवाडीचे नाम.दीपक केसरकर आता मात्र पर्यटनमंत्री पदाचा कारभार त्यांच्याकडे असतानाही जिल्ह्याचा पर्यटनातून विकास व्हावा असे त्यांना वाटताना दिसून येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रकिनारे, निसर्ग सौंदर्य हे देशातील इतर कुठल्याही जिल्ह्यापेक्षा विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे गोव्यासारखाच पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी नाम. केसरकर यांच्याकडून प्रयत्न होणे आवश्यक होते. परंतु गोव्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारूच्या किमती कमी करा अशी अजब मागणी नाम.केसरकर यांनी सावंतवाडीतील सभेत मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवली; त्यामुळे आता दारूच्या विक्रीतून सिंधुदुर्गचा विकास होणार की काय..? असा अजब गजब प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या समोर उभा राहिला आहे.