You are currently viewing सिंधुदुर्ग टीचर्स टॉक फोरम मध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे

सिंधुदुर्ग टीचर्स टॉक फोरम मध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे

एस आर दळवी फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त रामचंद्र उर्फ आबा दळवी यांचे आवाहन

कुडाळ:

 

बदलत्या काळानुसार शिक्षकांना सामाजिक व आर्थिक सक्षम करण्यासह सेवाभावीवृत्तीने ज्ञानदान करणे हाच एस आर दळवी फाऊंडेशनचा मुख्य उद्देश असुन फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग टाॅक फोरममध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन एस आर दळवी फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त रामचंद्र उर्फ आबा दळवी यांनी केले.

एस आर दळवी फाउंडेशनच्या सिंधुदुर्ग टीचर्स टॉक फोरमच्या कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे घेण्यात आलेल्या पहिल्या स्नेहबंध कार्यक्रमात आबा दळवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर एस आर दळवी फाऊंडेशनच्या संस्थापक विश्वस्त सौ सिता दळवी, मुंबईचे प्रसिद्ध मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रा. विनय खामकर, राज्य पदाधिकारी महेश सावंत, सिंधुदुर्ग टीचर्स टाॅक फोरमचे जिल्हाध्यक्ष सचिन मदने, सरचिटणीस विजय गावडे, उपाध्यक्ष चेतन बोडेकर, सल्लागार किशोर सोन्सूरकर, सर्व जिल्हा पदाधिकारी, कुडाळ तालुका अध्यक्ष ह्रदयनाथ गावडे, मालवण तालुका अध्यक्षा सौ तेजल ताम्हणकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष संदेश तुळसणकर, देवगड तालुका अध्यक्ष संदिप कोळेकर, कणकवली तालुका अध्यक्ष हेमंत राणे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष तुषार आरोसकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, दोडामार्ग तालुका अध्यक्ष संतोष गवस तसेच सर्व तालुका सचिव, इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावेळी फाउंडेशनच्या संस्थापक विश्वस्त सौ सिता दळवी यांनी एस आर दळवी फाऊंडेशनच्या कार्याची व्याप्ती जिल्ह्यात वाढवल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सचिन मदने व संपूर्ण टीमचे खास कौतुक केले. यावेळी विनय खामकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा शैक्षणिक दृष्टया राज्यात अव्वल असून पर्यटन व स्वच्छतेतही या जिल्ह्याचे काम राज्याला आदर्शवत आहे. हाच आदर्श समोर ठेवून एस आर दळवी फाउंडेशनच्या सिंधुदुर्ग टीचर्स टाॅक फोरमने सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरवोद्गगार काढले. यावेळी महेश सावंत यांनी एस आर दळवी फाउंडेशनची निर्मिती व उद्देश स्पष्ट केला. तर सचिन मदने यांनी स्नेहबंध कार्यक्रमाचे महत्व व फाऊंडेशनच्या राज्यभरातील विस्ताराची माहिती दिली.

*जिल्ह्यात 800 पारंपारिक वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प* 

फाऊंडेशनचे मालवण तालुका पदाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक वनीकरण वृक्षसंवर्धन अध्यक्ष प्रा प्रकाश कानूरकर यांच्या संकल्पनेतून फाउंडेशनच्या माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ उपस्थित सर्व तालुकाध्यक्षांना सुपारीच्या रोपांचे वितरण करून करण्यात आला. याच अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८०० पारंपारिक वृक्ष, वड ,पिंपळ, चिंच, जांभूळ, सातीवन आदी वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग टीमच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांना आबा दळवी यांच्याहस्ते ओळखपत्र व नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी वर्षभरात राबविण्यात येणा-या उपक्रमांबाबत आयोजित केलेल्या मुक्त चर्चासत्राला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शिक्षकांनी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम सुचवले. यावेळी फाऊंडेशनच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी स्नेहबंध कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आबा दळवी संपूर्ण टीमचे अभिनंदन करीत संवाद साधला.

*फाऊंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी महेश सावंत* 

एस आर दळवी फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग शाखेचे संस्थापक अध्यक्ष महेश सावंत यांच्या नेतृत्वाखालील फाउंडेशनचे जिल्ह्यातील शिस्तबद्ध व आदर्शवत काम फाउंडेशनच्या राज्यभरातील शाखांना प्रेरणादायी व आदर्शवत आहे. त्यामुळेच या फाऊंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष म्हणून महेश सावंत यांच्या नावाची घोषणा फाऊंडेशनचे विश्वस्त आबा दळवी यांनी जाहिर केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गावडे, सुत्रसंचालन सौ तेजल ताम्हणकर व प्रसाद गावडे यांनी तर आभार ह्रदयनाथ गावडे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा