सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण एक सप्ताह उपक्रम आयोजित केले गेले. या पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या सर्व उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी व त्याचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचावे हा उद्देश सफल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमामध्ये इयत्ता १ च्या सर्व विद्यार्थ्यांकडून सह. शिक्षिका सौ. जागृती तेंडोलकर व सौ. चैताली वेर्लेकर यांनी ओवा, कोरफड अशी औषधी झाडे त्याचप्रमाणे, झेंडू, जास्वंद व करंड्याच्या फुलाचे व मातीच्या दलदलीत वाढणारे कमळ अशी फुलझाडे, तसेच मनीप्लान्टची वेल लावून घेतली. याकरिता सह. शिक्षिका कु. विनायकी जबडे व सौ. नाफिसा शेख यांनी देखील सहाय्य केले. इयत्ता २री व ३रीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात भेंडी, भोपळा, गवार, मिरची , मुळा, चिबुड आणि काकडी अशा भाज्यांची लागवड केली. या विद्यार्थ्यांना सह. शिक्षिका सौ. कविता पटेल, सौ. दिशा कामत, सौ. ग्रीष्मा सावंत व सौ. जागृती तेंडोलकर यांनी झाडांच्या लागवडीबाबत व फळझाडांच्या वाढीबाबत योग्य मार्गदर्शन केले. इयत्ता ४ थी व ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिनानिमित्त कुणकेरी जंगलात भेट दिली. सह. शिक्षिका सौ. ग्रीष्मा सावंत, सौ. सुषमा पालव, सौ. प्राची साळगावकर व सौ. अश्विनी जोशी यांनी पर्यावरण दिनानिमित्त इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित केली. या शैक्षणिक सहलीत गावाचे पोलिस पाटील तसेच वनरक्षक श्रीयुत भोजणे यांनी त्यावेळी विद्यार्थ्यांना वनसंवर्धनाविषयी माहिती दिली. व विद्यार्थ्यांनी कोणत्या जागेत त्यांनी बनवलेले बीजबाॅल फेकावेत जेणेकरून त्यापासून झाडे व्यवस्थित उगवून येतील यासंबंधीचे योग्य मार्गदर्शन केले. या जंगलसफारीचा व वनरक्षकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. याच सप्ताहात शालेय वाचनालयामध्ये देखील सह. शिक्षिका सौ. अश्विनी जोशी यांनी पर्यावरण दिनाला अनुसरून विद्यार्थ्यांकडून गोष्टी वाचून घेतल्या. इयत्ता २री, ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी ‘ नोना आणि सफरचंदाच झाड ‘ ही गोष्ट वाचली. इयत्ता ३ री व ४ थी च्या मुलांनी मिळून हाताच्या पंजांनी एक झाडाचे चित्र काढले. व त्या झाडाला ‘एस्.एस्.जी.एस्. लायब्ररी ट्री’ हे नाव देण्यात आले. इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांनी ‘ कसोलीची करामत’ ही गोष्ट वाचली. त्याद्वारे विद्यार्थ्यांना ‘ खवले मांजर’ या नवीन प्राण्याची ओळख झाली. व झाडांप्रमाणे पर्यावरणात प्राण्यांनाही किती महत्त्वाचे स्थान आहे, याचे विद्यार्थ्यांना ज्ञान झाले. अशाप्रकारे, पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या या सर्व भरगच्च उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी एका आठवड्याच्या कालावधीत आनंद उपभोगला. विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमांसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका
सौ. दिशा कामत व शाळेचे संस्थापक ‘श्री. रुजुल पाटणकर’ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढच्या वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना पाठिंबा व शुभेच्छा दिला.