वक्तृत्व, काव्यवाचन, कथालेखन, अभिवाचनासह विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पार्थ सामंत, वैदेही आरोंदेकर, वैभव मेस्त्री, वैश्विका कदम यांच्यासह अनेकांनी पटकावले प्रथम क्रमांक
मालवण : मराठी भाषेची गोडी वाढविणे, वाचनसंस्कृती रुजविणे आणि जिल्ह्यातील नवोदित साहित्यिकांना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ निमित्त घेण्यात आलेल्या दहा विविध स्पर्धांचे निकाल जाहीर झाले आहेत. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील एकूण २९८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. वक्तृत्व, शब्दकोडे, प्रश्नमंजुषा, काव्य रसग्रहण, स्वरचित काव्यवाचन, कथालेखन, अभिवाचन, ऑनलाइन साहित्यसंपदा, साहित्ययात्री रील आणि महिलांसाठी उखाणे अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ साहित्यप्रेमींपर्यंत अनेकांनी आपले कौशल्य सिद्ध केले.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये शब्दकोडे स्पर्धेत ३३, साहित्य संपदा प्रश्नमंजुषेत ४७, बॅरिस्टर नाथ पै जीवनदर्शन स्पर्धेत ३३, वक्तृत्व स्पर्धेत ११, अभिवाचनाच्या खुल्या गटात २० व युवा गटात ३१, स्वरचित काव्य सादरीकरणात १८, कथालेखनात २७, साहित्ययात्री रील स्पर्धेत १७, उखाणे स्पर्धेत ५४ आणि काव्य रसग्रहण स्पर्धेत ७ स्पर्धक सहभागी झाले.
वक्तृत्व स्पर्धेत पार्थ सामंत, अस्मी आठलेकर प्रथम
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकलेची आवड निर्माण व्हावी आणि स्थानिक क्रांतिवीरांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण येथील पार्थ प्रदीप सामंत आणि अस्मी अशोक आठलेकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ओझर विद्यामंदिर, मालवण येथील स्वरा चंद्रशेखर कांबळी हिने द्वितीय, तर दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग येथील प्रांजल नामदेव गावडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. सुभी काशिराम झाड हिला उत्तेजनार्थ प्रथम, तर वैष्णवी विश्राम गावडे हिला उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला. पद्मनाभ शिरोडकर आणि दीपक भोगटे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
शब्दकोडे स्पर्धेत महादेव घोडके, सुषमा प्रभूगांवकर अव्वल
मराठी शब्दसंपत्ती वाढविणे आणि बॅरिस्टर नाथ पै यांच्या कार्याची ओळख करून देण्याच्या उद्देशाने २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित शब्दकोडे स्पर्धेत महादेव श्रीहरी घोडके आणि सुषमा युगलकिशोर प्रभूगांवकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. गौरी अभिजीत केणी हिने द्वितीय, तर पांडुरंग कृष्णा राणे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. चित्रा निलेश हिरे हिला उत्तेजनार्थ प्रथम, तर विवा विराज तळाशिलकर आणि सायली श्रीकृष्ण परब यांनी उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळविला.
प्रश्नमंजुषेत सहा स्पर्धकांना प्रत्येकी १०० गुण
प्रश्नमंजुषा स्पर्धेत विवा विराज तळाशिलकर, पांडुरंग कृष्णा राणे, चित्रा निलेश हिरे, रेश्मा सुषण ढवण, ऋतुजा मुळे आणि मोहिनी हडकर यांनी प्रत्येकी १०० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. स्वरा पाटकर, सुषमा युगलकिशोर प्रभूगांवकर आणि नेहा सामंत यांनी प्रत्येकी ९८ गुण मिळवत द्वितीय, तर महादेव श्रीहरी घोडके, गौरवी पराडकर आणि गौरी अभिजीत केणी यांनी प्रत्येकी ९६ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. साक्षी मेस्त्री आणि राधा घोगरे यांनी ९४ गुणांसह उत्तेजनार्थ प्रथम, तर सायली परब, जान्हवी चव्हाण आणि प्राची सचिन राजाध्यक्ष यांनी ९२ गुणांसह उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळविला.
काव्य रसग्रहण स्पर्धेत वैदेही आरोंदेकर प्रथम
श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी आयोजित काव्य रसग्रहण स्पर्धेत ओरोस येथील वैदेही विलास आरोंदेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना तीन हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथभेट देण्यात येणार आहे. मालवण येथील दीपक धर्माजी जाधव यांनी द्वितीय, तर सावंतवाडी येथील सृष्टी प्रशांत पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला. त्यांना अनुक्रमे दोन हजार आणि एक हजार रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. लक्ष्मी लक्ष्मण धारगळकर आणि विजय चंद्रकांत ठाकर यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. एन. डी. कार्वेकर आणि प्रा. मिलिंद कासार यांनी केले.
ऑनलाइन साहित्यसंपदा स्पर्धेत पार्वती कोदे प्रथम
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखकांच्या साहित्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ऑनलाइन स्पर्धेत पार्वती कोदे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. अनिल देवकुळे आणि प्रेरणा चिंदरकर यांनी द्वितीय, तर धनश्री तारी, वैष्णवी आचरेकर, विशाखा पालव आणि रोहिणी मसुरकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
स्वरचित काव्यवाचनात निधी धारपवार अव्वल
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्यात आलेल्या स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट येथील निधी निनाद धारपवार हिने प्रथम क्रमांक मिळविला. याच शाळेतील कणिका मंगेश पाटकर आणि वराडकर हायस्कूल, कट्टा येथील ओंकार साहिल रोहिलकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. वैदेही वामन लाड हिने तृतीय क्रमांक पटकावला. चैताली उमेश सावंत, वेदांत गुरुप्रकाश म्हाडगुत, सिया सचिन पाताडे आणि गायत्री गणेश साळुंके यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले.
कथालेखन स्पर्धेत वैभव मेस्त्रीची ‘विघटन’ कथा प्रथम
नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित कथालेखन स्पर्धेत वैभव मेस्त्री यांनी ‘विघटन’ या कथेसाठी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांना ४५०० रुपये रोख, ५०० रुपयांची ग्रंथभेट आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. तन्वी परब हिच्या ‘सुरंगीचा बहार’ या कथेला द्वितीय, तर यतिका जाधव हिच्या ‘निकालाच्या पलीकडे’ या कथेला तृतीय क्रमांक मिळाला. दर्श बलराम सामंत यांच्या ‘सान्यार’ कथेला उत्तेजनार्थ प्रथम, वैश्विका नागेश कदम यांच्या ‘शाळेची शेवटची घंटा’ आणि वेदांत अवंती शिवप्रसाद नाईक यांच्या ‘चित्कला’ या कथांना उत्तेजनार्थ द्वितीय, तर श्रुती राऊळ यांच्या ‘झाकोळा’ कथेला उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक मिळाला. ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांनी परीक्षण केले.
अभिवाचन स्पर्धेत युवा गटात वैश्विका कदम, खुल्या गटात दीपक जाधव प्रथम
१८ ऑक्टोबर रोजी झालेल्या अभिवाचन स्पर्धेच्या युवा गटात वैश्विका नागेश कदम हिने प्रथम क्रमांक मिळविला. सुधीर संदीप आरस याने द्वितीय, तर स्वरा चंद्रशेखर कांबळी आणि प्राची संतोष वेंगुर्लेकर यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला. पार्थ उमेश सामंत आणि भक्ती खरवते यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाला.
खुल्या गटात मालवण येथील दीपक धर्माजी जाधव यांनी प्रथम, शुभ्रा शांताराम कांदळगांवकर यांनी द्वितीय, तर स्वाती संदीप हळदणकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. नचिकेत नारायण पवार आणि अक्षता किशोर कुबल यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाला.
साहित्ययात्री रील स्पर्धेत तन्मय नाईक प्रथम
डिजिटल माध्यमांतून साहित्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित साहित्ययात्री रील स्पर्धेत तन्मय नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना ४५०० रुपये रोख आणि ५०० रुपयांची ग्रंथभेट देण्यात येणार आहे. शिवराज सावंत यांनी द्वितीय, तर वरद प्रभू यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तनश्री चव्हाण आणि मृणाल पाटकर यांना उत्तेजनार्थ स्थान मिळाले. सोशल मीडिया प्रभावक लक्ष्मीकांत कांबळी, मनोज उर्फ लारा मयेकर आणि गौरेश कांबळी यांनी परीक्षण केले.
महिलांच्या उखाणे स्पर्धेत मधुरा गोवेकर यांना पैठणी
महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित उखाणे स्पर्धेत मधुरा महेश गोवेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना पैठणी देऊन गौरविण्यात येणार आहे. मानसी मिटकर आणि नंदिनी सुतार यांनी द्वितीय क्रमांक मिळविला असून त्यांना कोल्हापुरी साज देण्यात येणार आहे. वैशाली सावजी आणि मैत्रेयी बांदेकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. अश्विनी आचरेकर आणि वैष्णवी आचरेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले.
या सर्व स्पर्धांमधील यशस्वी स्पर्धकांना रोख पारितोषिके, ग्रंथभेट, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्रे तसेच विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांनाही सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येतील.
साहित्य, संस्कृती आणि डिजिटल माध्यमांचा संगम
या स्पर्धांच्या माध्यमातून वाचन, लेखन, वक्तृत्व, काव्य, कथाकथन, अभिवाचन आणि लोकपरंपरा यांसह डिजिटल माध्यमांनाही साहित्यप्रसाराच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक क्रांतिवीरांचा इतिहास, बॅरिस्टर नाथ पै यांचे सामाजिक योगदान आणि सिंधुदुर्गातील लेखकांची साहित्यसंपदा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या उपक्रमांतून साध्य होत आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून सर्व वयोगटांतील नागरिकांपर्यंत साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी आयोजित या स्पर्धांनी जिल्ह्यातील साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा दिली आहे.
