You are currently viewing केळुस येथील आकाश फिश मिलमुळे परिसरात दुर्गंधी
Oplus_16908288

केळुस येथील आकाश फिश मिलमुळे परिसरात दुर्गंधी

मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर; म्हापण, पाट, हुमरमळा, माड्याचीवाडीतील नागरिक त्रस्त

कुडाळ : केळुस येथील आकाश फिश मिल कंपनीतून मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे परिसरातील गावांमध्ये दुर्गंधीची समस्या निर्माण झाली आहे. मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडत असल्याने म्हापण, पाट, हुमरमळा आणि माड्याचीवाडी परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेणार असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी दिली.

केळुस येथील आकाश फिश मिल कंपनीबाबत यापूर्वीही विविध तक्रारी करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या सुमारास मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांची ये-जा वाढली आहे. या वाहनांमधून मच्छीचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडत असल्याने संपूर्ण मार्गावर दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसह स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, परिसरात रोगराई पसरण्याचा धोकाही असल्याचे अतुल बांगे यांनी सांगितले. आकाश फिश मिल कंपनीच्या मच्छी वाहतूक व्यवस्थेमुळे निर्माण होणाऱ्या या समस्येवर तातडीने उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्य व्यवस्था करावी, वाहनांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडणार नाही याची दक्षता घ्यावी आणि नागरिकांना होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येणार आहे.

या समस्येबाबत पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहे. आकाश फिश मिलमुळे निर्माण झालेल्या या समस्येवर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी अतुल बांगे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा