You are currently viewing कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार : आमदार सुहास बाबर

कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार : आमदार सुहास बाबर

दिवाळीनिमित्त विटा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २२ हजार रुपयांचा बोनस जाहीर

विटे / प्रदीप जोशी :

विटा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण सदैव खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी दिली. विटा नगरपरिषदेचे कर्मचारी शहराच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असून, विशेषतः पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी अत्यंत जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

विटा नगरपरिषद येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायती कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना, शाखा विटा यांच्या वतीने आयोजित संघटनेच्या नामफलक उद्घाटन व सत्कार समारंभात ते बोलत होते. आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळीचा आनंद द्विगुणित; कर्मचाऱ्यांना २२ हजारांचा बोनस

विटा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून विटा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताच्या दृष्टीने पालिका नेहमीच सकारात्मक भूमिका घेईल. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २२ हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला असून, यामुळे कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे.

कर्मचाऱ्यांना संविधानाच्या उद्देशिकेची प्रत भेट

नगराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे यांनी कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नगरपरिषद कर्मचाऱ्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत भेट देण्यात आली. संविधानातील मूल्ये आणि लोकशाही तत्त्वांची जाणीव प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांचा कर्मचारी संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास आमदार सुहास बाबर, नगराध्यक्षा सौ. काजलम्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा