You are currently viewing देवगडमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासूर स्पर्धा

देवगडमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासूर स्पर्धा

देवगडमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासूर स्पर्धा

फ्रेंड्स सर्कलतर्फे आयोजन; खुल्या गटासाठी १२ हजारांचे प्रथम पारितोषिक

देवगड,

कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देवगड-सडा येथील फ्रेंड्स सर्कलच्या वतीने शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी भव्य नरकासूर स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. देवगड येथील फ्रेंड्स सर्कल नाका येथे ही स्पर्धा रंगणार असून खुला गट आणि मिनी नरकासूर अशा दोन गटांत स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेतील खुल्या गटासाठी प्रथम क्रमांकाला १२ हजार, द्वितीय क्रमांकाला ८ हजार आणि तृतीय क्रमांकाला ४ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तर मिनी नरकासूर गटासाठी अनुक्रमे १ हजार ५००, १ हजार आणि ५०० रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय उत्कृष्ट प्रवेशासाठी (बेस्ट एंट्री) १ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे.
खुल्या गटातील नरकासुराची उंची कमाल १२ फूट, तर मिनी नरकासुराची उंची ३ फुटांपर्यंत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करणे बंधनकारक असून नोंदणीवेळी प्रतिनिधीचे नाव देणे आवश्यक आहे.
स्पर्धेच्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत नरकासूर स्पर्धास्थळी आणणे बंधनकारक आहे. त्यानंतर येणाऱ्या स्पर्धकांचे १० गुण वजा करण्यात येतील. प्रत्येक मंडळाला सादरीकरणासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धास्थळी नरकासूर दहन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वाहतूक व वीज वाहिन्यांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊन मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी आदेश बांदेकर (७२६२०११७०८), चरण काटोकर (८९७५५५४५७३) व विघनेश प्रभू (९०९६१५२८११) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा