सुभाष पाटील यांचा सवाल
विटे / प्रदीप जोशी :
साखर कारखानदार आणि सरकार ऊस दराबाबत नेमकी भूमिका कधी घेणार? टाळाटाळ करून त्यांना नेमके काय साध्य करायचे आहे? असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे नेते सुभाष पाटील यांनी केला आहे.
त्यांनी दिलेली माहिती अशी, राज्यातील साखर कारखान्याचे बाॅयलर पेटून आता महीना पूर्ण होऊन गेला आहे. प्रत्यक्ष समारंभपूर्वक उसाची मोळी टाकण्याचे साग्रसंगीत कार्यक्रम पार पडले. कारखाने सुरू झाले. त्याचे अगोदर पासून ऊसाला योग्य भाव द्यावा म्हणून अनेक शेतकरी व संघटना मागणी करत आहेत. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत. कारखानदार , साखर आयुक्त , सरकार यांच्या कानीकपाळी ओरडून आपले गाऱ्हाणे मांडत आहेत. अनेक शेतकरी संघटना 7900/-पासून 5500/- पर्यंत ऊसाला प्रती टन दर मागत आहेत. गुजरात मधील कारखाने गेल्या वर्षीच्या उसाला रुपये 4500/-ते 4300/-पर्यत दर देत आहेत.
सांगली जिल्ह्यातील आंदोलन तीव्र स्वरूप धारण करायला लागले आहे. ऊसाने भरलेले ट्रॅक्टर आडवणे , त्यांच्या चाकातील हवा स़ोडणे , टायर पंक्चर करणे , कारखानदाराना भेटून विनंती करणे, रॅली काढणे एवढे करूनही कारखानदार आणि सरकार कसलीच दाद घेत नाही म्हटल्यावर चार ठिकाणी ऊस भरलेल्या ट्रॉलीना आगी लावल्या गेल्या. तरीही अजूनही कारखानदार चकार शब्द बोलायला तयार नाहीत. सर्वजण गप्प बसलेले आहेत. शेतकऱ्यांचा संघर्ष कोणत्या टोकाला जाण्याची वाट सरकार आणि कारखानदार पहात आहेत? हे समजत नाही.
आपण शेतकर्याना दिलासा देण्यासाठी ऊसाला किती रुपयांपर्यंत दर देणार आहेत? हे सांगून दराची कोंडी का फोडत नाहीत.
