नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांनी वाद मिटवून विकासकामांना गती द्यावी
२८ कोटींच्या कामांची चौकशी करण्याची मागणी, मोती तलावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेणार
सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यामध्ये सध्या शीतयुद्ध सुरू असून, नगराध्यक्षांवरच विश्वास नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या वादामुळे सावंतवाडी शहराचा सत्यानाश होण्याची भीती माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी व्यक्त केली. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी आपापसांतील वाद मिटवावेत आणि जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ऑडिटर अनुपस्थित असताना ऑनलाइन उपस्थित असलेल्या उपनगराध्यक्षांनी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले की, सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये सध्या सुरू असणारा धुमाकूळ बघवत नाही. प्रशासन कसे चालवायचे, याची जाणीव नसल्याने हा प्रकार ओढवला आहे. वेंगुर्ल्यात दिलीप गिरीप काम करत आहेत, तसेच काम सावंतवाडीतही अपेक्षित आहे. मात्र, येथे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे.
विशेष सभेत ‘थर्ड पार्टी ऑडिट’ समाधानकारक असल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यावेळी उपनगराध्यक्ष ऑनलाइन उपस्थित होते. जर त्यांना ऑडिटरच्या कामाबाबत आक्षेप होता, तर तो त्याचवेळी का घेतला नाही? नगराध्यक्षांनी ऑडिटर नसताना सभा घेतली, याचा अर्थ त्यांना ऑडिटरची आवश्यकता वाटली नाही. ऑडिटरवर नगराध्यक्षांचा विश्वास असेल, मात्र नगराध्यक्षांवर उपनगराध्यक्षांचा विश्वास नाही का, असा सवाल संजू परब यांनी केला.
सभेत नगराध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाला किंमत नसल्याचे दिसून येत असून, त्यामुळेच उपनगराध्यक्ष बाहेर येऊन विरोध करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वादात शहरातील विकासकामे रखडू नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
काम बंद पडल्यास खर्चाची किंमत दुप्पट होण्याची शक्यता असून, भविष्यात शहराला पाणी मिळण्यातही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी आपापले वाद मिटवावेत आणि जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहन त्यांनी केले. विशेष सभेत झालेला ठराव बदलता येतो का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच, २८ कोटींची कामे झाली आहेत की नाहीत, याबाबत सीईओंनी विचारणा करावी. कामांची चौकशी करून कोणी पैसे खाल्ले असतील, तर त्याची माहिती समोर आणावी. नगरपरिषदेत सत्ताधारी ते आहेत, आम्ही नाही, त्यामुळे काम पूर्ण झाले नसताना बिल दिले का, याची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही संजू परब यांनी केले.
दरम्यान, सावंतवाडीचे मानबिंदू असलेल्या मोती तलावात ड्रेनेजचे पाणी सोडले जात असल्याचा मुद्दाही संजू परब यांनी उपस्थित केला. याबाबत आवाज उठवल्यानंतर नगरपरिषदेकडून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, केवळ कारवाई करून सांडपाणी सोडणे बंद होणार का, असा सवाल त्यांनी केला.
मोती तलावाच्या संवर्धनासाठी संघटना निर्माण करण्यात येणार असून, तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोती तलाव वाचविण्यासाठी आमदार दीपक केसरकर, निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेणार असल्याचे संजू परब यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक आदी उपस्थित होते.
