आंबा व काजू पिकांसाठी कृषी सल्ला जाहीर
तुडतुडे, करपा रोग व किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांमध्ये नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाली असून, काही काजूच्या झाडांना मोहोरही दिसू लागला आहे. सध्या ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांच्यामार्फत दि. २४ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी आंबा व काजू पिकांचा कृषी सल्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील सहयोगी संशोधन संचालक वैभव शिंदे यांनी जाहिर केला आहे.
आंबा पिकासाठी उपाययोजना
आंब्याच्या अनेक बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन पालवी आली असून, उर्वरित बागांमध्येही पालवी फुटण्यास सुरुवात झाली आहे. तुडतुडे किडीमुळे पालवीतील रस शोषला जाऊन नुकसान होऊ शकते. तसेच पालवीवर चिकटा पडून त्यावर काळ्या बुरशीची वाढ होण्याची शक्यता आहे.
नवीन पालवीवर तुडतुडे किडीचा किंवा दि. २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या उपाययोजना कराव्यात. तुडतुडे किडीच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन ९ मिली आणि करपा रोगाच्या नियंत्रणासाठी थायोफिनेट मिथाइल १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात स्वतंत्रपणे फवारणी करावी.
फवारणीतील औषध पालवीवर व्यवस्थित चिकटण्यासाठी व समान रीतीने पसरविण्यासाठी शिफारशीनुसार स्टिकर व स्प्रेडरचा वापर करावा. कोवळ्या पालवीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास टोलफेनपायरॅड २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पालवीची वाढ जोमाने होण्यासाठी तसेच ती लवकर परिपक्व होण्यासाठी ०:०:५० आणि १३:०:४५ ही पाण्यात विरघळणारी खते प्रत्येकी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात स्वतंत्रपणे फवारावीत.
काजू पिकासाठी सल्ला
काजूच्या वेंगुर्ला-१, वेंगुर्ला-४, वेंगुर्ला-७, वेंगुर्ला-९ आणि वेंगुर्ला-१० या प्रसारित वाणांना नवीन पालवी येण्यास सुरुवात झाली आहे. वेंगुर्ला-१ आणि वेंगुर्ला-१० या वाणांच्या काही झाडांवर मोहोर दिसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने नवीन पालवीचे ढेकण्या किडीपासून संरक्षण करण्यासाठी लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील १५ दिवसांत नवीन पालवीतून मोहोर येऊन त्याची वाढ होण्याची शक्यता आहे.
काजूच्या झाडांभोवती जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडाच्या बुंध्याभोवती जैविक आच्छादन करावे.
हवामानाची स्थिती
मागील आठवड्यातील कृषी सल्ला दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी देण्यात आला होता. त्यानंतर वातावरणात फारसा बदल झालेला नाही. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला असून, पहाटेच्या वेळी थंडीत अल्पशी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसभरातील हवेतील आर्द्रता कमी होऊन तापमान वाढल्याने उष्णतेची स्थिती जाणवत होती.
