कुपवाड येथील आठवडी बाजारात स्वच्छतेसाठी महापालिकेचे आवाहन
सांगली : प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार
सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कुपवाड कार्यक्षेत्रातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेतर्फे कचरा कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. आठवडी बाजारातील भाजी विक्रेत्यांनी व्यवसायादरम्यान निर्माण होणारा उर्वरित कचरा सार्वजनिक रस्त्यावर न टाकता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कंटेनरमध्येच टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मा. आयुक्त महोदया यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत बाजार परिसर स्वच्छ ठेवणे, रस्त्यांवर कचरा साचू न देणे आणि नागरिकांना स्वच्छ परिसर उपलब्ध करून देणे यावर भर देण्यात येत आहे.
आठवडी बाजारातील भाजी विक्रेते व व्यावसायिकांनी प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा. तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वच्छ बाजारपेठ, स्वच्छ रस्ते आणि स्वच्छ शहरासाठी विक्रेते व नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडून कुपवाड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले
या उपक्रमावेळी स्वच्छता अधिकारी सिद्धांत ठोकळे, स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे, गणेश धोतरे, अंजली कुदळे तसेच संबंधित भागाचे मुकादम उपस्थित होते.
