‘स्मृतिलेख : शब्दांची सावली हरपली…’मधून मनोहर शुक्ल यांच्या साहित्यविश्वाचा जागर
( अशा रणखांबे )
डोंबिवली /कल्याण:
साहित्य चर्चा मंच, डोंबिवली शाखेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक मनोहर रामचंद्र शुक्ल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘स्मृतिलेख : शब्दांची सावली हरपली…’ हा आदरांजली सोहळा गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पूर्व) येथे संपन्न झाला. साहित्य, आठवणी आणि भावनांच्या संगमातून त्यांच्या साहित्यिक योगदानासह स्नेहशील व्यक्तिमत्त्वाचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण शरद देवराय लिखित व दिग्दर्शित ‘सावली अजून आहे…’ हा काव्यमय प्रवास ठरला. शुक्ल यांच्या ‘सावली’ आणि ‘भरारी’ या काव्यसंग्रहांवर आधारित रसग्रहणाचे राखी येवले-कांबळे आणि दत्तराज पुजारी यांनी प्रभावी अभिवाचन केले.
साहित्य चर्चा मंचचे अध्यक्ष प्रा. शुक्राचार्य गायकवाड, कोषाध्यक्ष डी. आर. जोशी, ज्येष्ठ साहित्यिका दया घोंगे, ज्येष्ठ गझलकार बा. धो. ताम्हणकर आणि सुभाष रामचंद्र शुक्ल उपस्थित होते. मान्यवरांनी त्यांच्या साहित्यिक कार्याच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला.
शुक्ल यांचे नातू चिन्मय मिलिंद शुक्ल आणि अलोक शशिकांत भट यांनी आजोबांच्या आठवणी सांगताना त्यांच्या संस्कारांचा आणि मार्गदर्शनाचा आपल्या जीवनावर झालेला प्रभाव अधोरेखित केला. “पुढील जन्म जर खरेच मिळाला, तर आजोबा म्हणून हेच आजोबा मिळावेत; कारण अजूनही त्यांच्याकडून खूप काही शिकायचे आहे,” ही चिन्मय यांची भावना उपस्थितांना भावूक करून गेली. अलोक यांनी आजोबांनी दिलेला कलागुणांना वाव आणि सभाधीटपणाचा संस्कार व्यावसायिक जीवनात उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांनी शुक्ल यांच्या साहित्यिक योगदानाचा व स्नेहशील स्वभावाचा गौरव केला. शरद देवराय यांनी सूत्रसंचालन केले, तर विलास अधिकारी यांनी आभार मानले. शब्द, साहित्य आणि जिव्हाळ्याच्या आठवणींतून मनोहर शुक्ल यांना वाहिलेली ही आदरांजली भावस्पर्शी ठरली.
