You are currently viewing बैठ्या कार्यशैलीमुळे उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधींवर फिजिओथेरपी उपयुक्त; न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांचे प्रतिपादन

बैठ्या कार्यशैलीमुळे उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधींवर फिजिओथेरपी उपयुक्त; न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांचे प्रतिपादन

कुडाळ न्यायालयात फिजिओथेरपी आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

न्यायाधीश, विधीज्ञ व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन; सुमारे ४५ जणांनी घेतला शिबिराचा लाभ

कुडाळ : “बाह्य दुष्परिणाम विरहित चिरनिरंतर शारीरिक आरोग्यासाठी फिजिओथेरपी उपचार पद्धती अतिशय उपयुक्त आहे. कार्यालयीन कामकाजाच्या बैठ्या कार्यशैलीमुळे उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधींवर या उपचार पद्धतीद्वारे सहज मात करता येते. यासाठी सर्व कार्यालयीन कर्मचारी व संबंधितांनी वेळोवेळी या उपचार पद्धतीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन कुडाळ न्यायालयाचे न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. जी. ए. कुलकर्णी यांनी केले.

बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय, कुडाळ, तालुका विधी सेवा समिती, कुडाळ आणि तालुका बार असोसिएशन, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ न्यायालयाच्या आवारात न्यायाधीश, विधिज्ञ व कर्मचाऱ्यांसाठी फिजिओथेरपी आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. कुलकर्णी बोलत होते. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सर्वांनी आपले आरोग्य चांगले राखावे, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

यावेळी कुडाळ न्यायालयाच्या सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन. ए. बकरे, कुडाळ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. जी. टी. पडते, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. उमेश गाळवणकर, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल व त्यांचे सहकारी डॉक्टर उपस्थित होते. तसेच ॲड. सुहास सावंत, ॲड. श्रीमती नीलांगी रांगणेकर, ॲड. विवेक मांडकुलकर, ॲड. सुनील लोट, ॲड. जे. एस. सामंत, ॲड. डी. एस. सामंत, ॲड. बी. पी. परब, ॲड. एस. एस. कुलकर्णी, ॲड. डी. आर. बिले यांच्यासह न्यायालयातील अन्य विधिज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.

सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन. ए. बकरे यांनीही न्यायालयीन कामकाजाचे स्वरूप आणि बैठकीच्या व्यवस्थेचा विचार करता, व्याधीमुक्त जीवनासाठी फिजिओथेरपी उपचार पद्धतीचे मार्गदर्शन दैनंदिन जीवनात निश्चितच लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या फिजिओथेरपी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले.

बैठ्या जीवनशैलीमुळे शारीरिक समस्यांचा धोका

फिजिओथेरपी उपचार पद्धतीची माहिती देताना बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल यांनी सांगितले की, न्यायालयीन कामकाजाचे स्वरूप, दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करणे आणि सतत संगणकाचा वापर करणे यांसारख्या बैठ्या जीवनशैलीमुळे मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी तसेच स्नायू व सांध्यांशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. या समस्या कमी करण्यासाठी, शारीरिक कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि भविष्यातील शारीरिक व्याधी टाळण्यासाठी फिजिओथेरपी ही प्रभावी उपचारपद्धती ठरू शकते.

न्यायालयीन व कार्यालयीन कामकाजात अनेकदा सलग कित्येक तास बसून राहावे लागते. त्यामुळे शरीराची चुकीची ठेवण, स्नायूंवर येणारा ताण आणि हालचालींचा अभाव यांमुळे विविध शारीरिक तक्रारी उद्भवू शकतात. अशा समस्या टाळण्यासाठी कामाच्या दरम्यान नियमित अंतराने विश्रांती घेणे, थोडे चालणे, योग्य बैठक पद्धतीचा अवलंब करणे, कामाच्या जागेची रचना शरीराला अनुकूल ठेवणे आणि दैनंदिन जीवनात नियमित व्यायामाचा समावेश करणे आवश्यक आहे, असे डॉ. बिस्वाल यांनी स्पष्ट केले.

फिजिओथेरपी ही केवळ वेदना कमी करण्यापुरती मर्यादित नसून शरीराची हालचाल सुधारण्यासाठी, स्नायूंची ताकद व लवचिकता वाढविण्यासाठी आणि दैनंदिन कामकाज अधिक सहजपणे करता यावे यासाठीही उपयुक्त ठरते. वेळेत योग्य मार्गदर्शन व उपचार घेतल्यास अनेक शारीरिक समस्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून उपस्थितांना फिजिओथेरपी उपचार पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात आले.

सुमारे ४५ जणांना मार्गदर्शन व उपचार

या शिबिराला न्यायालयातील विधिज्ञ व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये सुमारे ४५ विधिज्ञ व कर्मचाऱ्यांना फिजिओथेरपीविषयक मार्गदर्शन आणि उपचार देण्यात आले. उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. प्रत्युष बिस्वाल यांनी उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. या उपक्रमामुळे न्यायालयीन अधिकारी, विधिज्ञ आणि कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.

न्यायालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य संवर्धन करणे, शारीरिक तक्रारींबाबत जागरूकता निर्माण करणे आणि फिजिओथेरपी उपचारपद्धतीचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. भविष्यात आवश्यकता भासल्यास अशा आरोग्यविषयक शिबिरांचे पुन्हा आयोजन करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

कुडाळ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. जी. टी. पडते यांनी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेला शुभेच्छा दिल्या. विधिज्ञ व कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारची शिबिरे आयोजित करून त्यांना फिजिओथेरपी आणि उपचार पद्धतींची माहिती देण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.

शिबिराचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कनिष्ठ लिपिक श्री. एच. ए. कारेकर यांनी केले. शिबिरासाठी आवश्यक व्यवस्था सहाय्यक अधीक्षक (प्रशासन) श्री. एस. डब्ल्यू. पई आणि वरिष्ठ लिपिक श्री. के. टी. कदम यांनी केली. या उपक्रमाबद्दल कुडाळ न्यायालयातर्फे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या फिजिओथेरपी महाविद्यालयाचे आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा