You are currently viewing विवेकानंद नगरात भक्तीचा जागर, सलग तिसऱ्या वर्षी दुर्गामातेचे आगमन

विवेकानंद नगरात भक्तीचा जागर, सलग तिसऱ्या वर्षी दुर्गामातेचे आगमन

विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

विटा शहरातील विवेकानंद नगर परिसरात सलग तिसऱ्या वर्षी भक्तिमय वातावरणात दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. निलेश कोरे व त्यांच्या पत्नी सौ. महानंदा कोरे यांच्या हस्ते विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी दादा कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.

दुर्गामातेच्या आगमनानिमित्त विवेकानंद नगर परिसरात उत्साहाला उधाण आले होते. देवीच्या स्वागतासाठी परिसरातील महिलांनी आकर्षक व मनमोहक रांगोळ्या साकारून परिसराचे सौंदर्य खुलवले होते. दुर्गामातेची मूर्ती परिसरात दाखल होताच भाविकांनी पुष्पवृष्टी करून देवीचे जल्लोषात स्वागत केले.

‘जय दुर्गामाता’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला! दुर्गामातेच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत देवीची मूर्ती आणि पवित्र ज्योत विशेष आकर्षण ठरली. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला, तर लहान मुलांनी वाजवलेल्या वाद्यांच्या निनादाने मिरवणुकीत चैतन्य निर्माण केले. देवीच्या जयघोषात आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

प्रतिष्ठापनेनंतर विधिवत आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. धार्मिक विधी, आकर्षक सजावट आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

सलग तिसऱ्या वर्षी सुरू असलेल्या या धार्मिक उपक्रमांतर्गत दररोज सकाळी व संध्याकाळी विविध जोडप्यांच्या हस्ते दुर्गामातेची पूजा करण्यात येणार आहे. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणाऱ्या या उत्सवामुळे विवेकानंद नगर परिसरात नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा