You are currently viewing एआयच्या युगात मानवी विवेकाचे महत्त्व कायम!

एआयच्या युगात मानवी विवेकाचे महत्त्व कायम!

*एआयच्या युगात मानवी विवेकाचे महत्त्व कायम!*

*एमआयटी एडीटी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रा. डॉ. एन. नागराजू यांचे प्रतिपादन*

पुणे :

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात माहिती मिळविणे आणि उत्तरे तयार करणे अधिक सुलभ झाले असले, तरी सत्य आणि असत्य यांतील फरक ओळखणे, चिकित्सक विचार करणे आणि नैतिक निर्णय घेणे यांसाठी मानवी क्षमता तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे भविष्यातील विद्यापीठांनी तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच विद्यार्थ्यांमध्ये मानवी विवेक, नैतिक जाणीव आणि स्वतंत्र विचारक्षमता विकसित करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस विद्यापीठाचे (ईएफएलयू), हैदराबादचे कुलगुरू प्रा. डॉ. एन. नागराजू यांनी केले.

भारतीय इंग्रजी भाषा शिक्षक संघटना (ELTAI) आणि एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २० व्या आंतरराष्ट्रीय आणि ५६ व्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

याप्रसंगी ब्रिटिश कौन्सिलचे उपसंचालक शॅनन वेस्ट, सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, केंब्रिज विद्यापीठाचे दक्षिण आशिया संचालक टी. के. अरुणाचलम, एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोव्होस्ट डॉ. सायली गणकर, डॉ. जॉन वर्गीस, डॉ. एम. एस. झेवियर, प्रदीप सिंग, परिषदेचे मुख्य आयोजक व स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे (एसएचडी) संचालक प्रा. डॉ. अतुल पाटील, तसेच ELTAI चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. किशोर सेल्वा बाबू आदी मान्यवर उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव केवळ तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्रापुरता मर्यादित न ठेवता सर्वच विद्याशाखांमध्ये एआय साक्षरता विकसित करणे आवश्यक असल्याचे प्रा. डॉ. नागराजू यांनी सांगितले. एआय लेखन, माहितीचे विश्लेषण आणि उत्तरांची पडताळणी करण्यास मदत करू शकते; मात्र ज्ञानाचा शोध घेणे, वास्तव आणि आभास यांतील फरक समजून घेणे, तसेच योग्य-अयोग्याचा विवेकपूर्ण निर्णय घेणे या मानवी क्षमतांना ते पर्याय ठरू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय भाषांचा विकास, सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संवाद यांचा समतोल साधणे ही उच्च शिक्षण क्षेत्रासमोरील महत्त्वाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. एआयच्या वाढत्या प्रभावामुळे भविष्यातील विद्यापीठांचे स्वरूप बदलणार असले, तरी शिक्षणाचा केंद्रबिंदू मानवी अनुभव, चिकित्सक विचार, सत्याचा शोध आणि नैतिक मूल्ये हाच राहिला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या क्षमतांचा प्रभावी वापर करताना मानवी विवेक जपणे, हेच भविष्यातील विद्यापीठांसमोरील महत्त्वाचे आव्हान असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

एमआयटी-एडीटी विद्यापीठातील स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज आणि स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट यांच्या यजमानपदाखाली आयोजित या परिषदेत भारतातील जवळपास एक हजार इंग्रजी शिक्षक व प्रतिनिधींनी, तसेच नेपाळ, बांगलादेश, इराक, उझबेकिस्तान, मलेशिया आणि थायलंडसह विविध देशांतील ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्वानांनी सहभाग नोंदविला. या वेळी सहभागी संशोधकांनी आपल्या संशोधनाचे सादरीकरण केले.

याप्रसंगी टी. के. अरुणाचलम, प्रा.डाॅ.सुनिता कराड, प्रा. डॉ. राजेश एस. आणि प्रा. डॉ. एन. नागराजू यांच्यासह डॉ. सायली गणकर यांनी देशभरातून आलेल्या इंग्रजी शिक्षक व संशोधकांना मार्गदर्शन केले. विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. डॉ. अशोक घुगे, डॉ. स्वप्निल शिरसाट आणि प्रा. स्नेहा वाघटकर यांनी परिषदेचे सूत्रसंचालन केले.

*चौकटी*
*अनिश्चिततेच्या काळात विचारपूर्वक निर्णय आवश्यक*
जागतिक स्तरावरील राजकीय, सामाजिक आणि तांत्रिक बदलांमुळे शिक्षणसंस्था आणि त्यांच्या नेतृत्वासमोर अनेक अनिश्चित आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत तातडीने निष्कर्ष काढण्याऐवजी विविध शक्यता समजून घेणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे, असे प्रा. डॉ. नागराजू यांनी नमूद केले.
या संदर्भात त्यांनी इंग्रजी कवी जॉन कीट्स यांच्या ‘निगेटिव्ह कॅपॅबिलिटी’ (Negative Capability) या संकल्पनेचा उल्लेख केला. अनिश्चितता आणि संदिग्धतेच्या परिस्थितीतही संयम राखून विचार करण्याची क्षमता या संकल्पनेतून अधोरेखित होते. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अशा परिस्थितीचा सामना करता यावा, यासाठी शिक्षणसंस्थांनी योग्य विचारप्रक्रिया विकसित करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

*वाचनाने बहुश्रुतता येते : पद्मश्री प्रभुणे*
कोणत्याही भाषेत पारंगत होण्यासाठी त्या भाषेतील उपलब्ध साहित्याचे वाचन केले पाहिजे. वाचनाची गोडी आणि सवय लागली की भाषा आपोआप आत्मसात होऊ लागते. वाचनामुळे शब्दसंग्रहासोबतच बहुश्रुतताही वाढते. त्यामुळे कोणत्याही विषयावर परखड मत मांडण्याचा आत्मविश्वास व्यक्तीमध्ये निर्माण होतो. भाषेला विज्ञानाची आवश्यकता नसली, तरी विज्ञानाला भाषेची आवश्यकता नक्कीच भासते, असे मत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘रीड फेस्ट’ अर्थात वाचन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वाचन महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा