You are currently viewing आर्जव
Oplus_16908288

आर्जव

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*🌧️आर्जव 🌧️*

 

झाली कोरडी जमीन

भेगा चिरे ओरबाड

रुते तिच्या खोलवर

घाव कुदळ कोरड

 

किती दिस वखवख

ढेकळे दगड जणू

काहिली जीवाची होई

तहानेले अणू रेणू

 

जलाचा न मिळे थेंब

ओसाडले रानवन

सारी कडे कोरडले

वाळलेले पान पान

 

पर्जन्याचा कोप भारी

माणसाने केली चढ

निसर्गाच्या माथ्यावर

होऊनिया वरचढ

 

म्हणूनच वरुणाचा

शाप लागे माणसाला

अवचित येई पाणी

कधी कोरड घशाला

 

कशी होई फसगत

चूक झाली माझी देवा

माफी याचना मागतो

करु नको आता हेवा

 

लोटांगण पायी तुझ्या

नाही जात तुझ्यापुढे

नतमस्तक होऊनि

घाली साकडे एवढे

 

एकोप्याने नांदू राहू

सारे आम्ही भाऊभाऊ

निसर्गाची हेळसांड

नाही आम्ही होऊ देऊ

 

आता आर्जवितो तुला

पाणी पाड शिवारात

मन चिंबाळ होऊ दे

पिकू दे रे शेतभात

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

विरार

प्रतिक्रिया व्यक्त करा